कुशल बद्रिकेची आषाढी वारीनिमित्तची 'ती' पोस्ट चर्चेत
मुंबई, 29 जून- आषाढी एकादशीचा उत्साह पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्रभरात दिसून येतो आहे. मराठी सेलेब्सनी देखील सोशल मीडिया पोस्ट करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता कुशल बद्रिके देखील सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. त्याने देखील यानिमित्त एक पोस्ट लिहिली आहे. सोबत काही फोटो देखील शेअर केले आहेत. कुशल बद्रिकेने म्हटले आहे की, अख्खी वारी करून ‘वारकरी’ नुसतं कळसाच्या पाया पडून परततात आणि मग लोक “विठ्ठल” म्हणून त्या वारकऱ्याच्याच पाया पडतात. ज्या वारकऱ्याने वारीत “प्रत्यक्ष” विठ्ठलाचं दर्शनच घेतलं नाही, तो स्वतःच “विठ्ठल” होऊन परततो . आणि इकडे रखुमाईच्या जन्माला येऊनही “विठ्ठल” नशिबात नसतो .दैवं सुद्धा कधी कधी कळसच गाठतं नाही का ? असो… आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. ( सुकून.) दरम्यान कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी खूप मस्त लिहिलं आहे, असे त्याला सांगितले आहे.
पंढरीची वारी. आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय.. आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात, आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो. ही वारी काही आजची नाही. गेली हजारो वर्षे या पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवायला लाखों वारकरी पायी वारी करत पंढरपूरला जात आहेत.
कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.तसेच कुशल सध्या चित्रपटांमध्येसुद्धा व्यग्र आहे.