Ramesh Babu Garu
नवी दिल्ली, 9 जानेवारी: साउथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) कोरोना पॉझिटीव्ह आहे. त्यामुळे तो आयसोलेशनमध्ये आहे. अशातच त्याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. महेश बाबूचा भाऊ अभिनेता घटमनेनी रमेश बाबू (Ramesh Babu Garu) यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. अभिनेता महेश बाबू यांचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचे हैदराबादमध्ये निधन झाले. रमेश बाबू हे यकृताच्या दीर्घ आजाराने त्रस्त होते. काही तासांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना तातडीने गचीबोवली येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रमेश बाबू यांचे (Ramesh Babu Passed away) निधन झाले. रमेश बाबू यांच्या आकस्मिक निधनावर अनेक टॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. महेश बाबू यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. रमेश बाबू यांच्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित राहू शकणार नाहीत. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रमेश बाबू यांनी 20 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. रमेश बाबूने बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि “चिन्नी कृष्णुडू” आणि “बाजार राउडी” सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. ते नायक म्हणून फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. नंतर ते निर्माता झाले. त्यांनी “अर्जुन” आणि “अथिधी” या चित्रपटांची निर्मिती केली, ज्यात महेश बाबू नायक होते. बी.ए.राजू यांनी घटमनेनी कुटुंबियांच्या वतीने ही दु:खद बातमी दिली आहे. आमचे स्वतःचे प्रिय रमेश बाबू गरू यांचे निधन झाले आहे.