मुंबई, 6 फेब्रुवारी: शेकडो प्रेमगीतं, युगुलगीतं समरसून गायलेल्या लतादीदींची(Lata Mangeshkar Love story)खऱ्या आयुष्यातली प्रेमकहाणी मात्र अपूर्णच राहिली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वेळी त्यांच्या अजरामर गाण्यांबरोबर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला संघर्ष आठवतो. त्यांना शेकडो मान-सन्मान मिळाले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या सन्मानाने आणि जगभराच्या रसिकांच्या प्रेमातच जगल्या. पण खऱ्या प्रेमाची कहाणी मात्र अधुरी राहिली. अनेक प्रेमगीतं गायलेल्या या महान गानसम्राज्ञीच्या आयुष्यात राजकुमार आला, मात्र आपापल्या आयुष्यात हे प्रेम फुलवण्य़ात मात्र ते दोघेही अपयशी राहिले. त्यांनी लग्न केलं नाही. संपूर्ण घराची जबाबदारी असल्यानं लग्न केलं नाही असंही म्हटलं जातं. मात्र लतादीदींचं एका राजकुमारावर प्रेम होतं अशीही एक चर्चा होती. लतादीदींनी स्वतः कधीच या गोष्टीचा उच्चार केला नाही. तत्कालीन डुंगरपूर संस्थानचे राजकुमार राजसिंह यांच्यावर लतादीदींचं प्रेम होतं. राजसिंह उत्तम क्रिकेटर होते. त्यांच्या क्रिकेटप्रेमामुळे पुढे ते क्रिकेट नियामक मंडळातही गेले आणि BCCI चे अध्यक्षही झाले. मात्र काही कारणांनी त्यांचं लता मंगेशकरांबरोबरचं प्रेम फुलू शकलं नाही. राजसिंह हृदयनाथ मंगेशकरांचे खूप चांगले मित्र होते. त्यांना क्रिकेटचं वेड होतं. मुंबईत अशताना त्यांचं हृदयनाथ मंगेशकरांच्या घरी येणं जाणं असल्यानं तिथेच त्यांची लता मंगेशकरांशी ओळख झाली. मात्र राजसिंह यांच्या वडिलांना ही गोष्ट पसंत नव्हती. त्यांचा लग्नाला विरोध होता. राजघराण्याबाहेरच्या ‘सामान्य’ घराण्यातल्या मुलीशी लग्न करायला डुंगरपूर महाराजांचा विरोध असल्याचं बोललं जातं. त्यांच्या लग्न न करण्याचं कारण गूढच राहिलं. पण राजसिंह डुंगरपूर यांनीही शेवटपर्यंत लग्न केलं नाही. ते पुढे BCCI चे अध्यक्ष झाले. पण या दोघांनीही त्यांचं असफल प्रेम कधीच उघडपणे व्यक्त केलं नाही. 2009 मध्ये राजसिंह डुंगरपूर यांचं निधन झालं.