मुंबई, 8 फेब्रुवारी- भारतीय सिनेरसिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय डॉक्युमेंट्री फिचर फिल्म Writing With Fire ला ऑस्करसाठी ( Oscars 2022 Nominations) नामांकन मिळालं आहे. रायटिंग विथ फायर या इंडियन डॉक्युमेंटरीमध्ये सुनिता प्रजापती (Suneeta Prajapati) , मीरा देवी (Meera Devi) आणि श्यामकली देवी (Shyamkali Devi ) यांच्या भूमिका आहेत. 94 व्या ऑस्करसाठी फिचर फिल्म गटातून 15 डॉक्युमेंट्री पुढे आल्या होत्या. आज अंतिम नामांकन जाहीर झाली असून आता 27 मार्च 2022 रोजी ग्रँड सोहळ्यात ऑस्कर पुरस्कारांची घोषणा होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सायं. 6.48 वाजता ऑस्कर पुरस्कारांसाठीच्या नामांकनाची घोषणा करण्यात आली. 2022 मध्ये 94 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 23 अकादमी श्रेणींसाठी नामांकन जाहीर करण्यात आले. अभिनेता ट्रेसी एलिस रॉस आणि हास्य कलाकार लेस्ली जॉर्डन यांनी हा कार्यक्रम होस्ट केला.
दरम्यान, फिचर फिल्म गटात ऑस्करसाठी एकूण 137 फिल्म निवडण्यात आल्या होत्या. यातील 15 फिल्मची अंतिम नामांकनासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये आरजे कटलर यांच्या The World’s a Little Blurry या फिल्मचीही निवड झाली होती. आज झालेल्या अंतिम नामांकनामध्ये भारतीय डॉक्युमेंट्री Writing With Fire ला नामांकन मिळाले आहे. त्यामुळे आता ऑस्कर पुरस्कारांच्या घोषणेसाठी 27 मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. लॉस एंजिल्समधील डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा होणार असून एबीसीवर आणि जगभरातील इतर 200 हून अधिक ठिकाणी याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
ऑस्कर अवॉर्डसाठी अभिनेता सूर्याचा ‘जय भीम’ हा तमिळ सिनेमा आणि मोहन लाल यांचा ‘मरक्कर: द लॉयन ऑफ द अरेबियन सी’ हे दोन भारतीय चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत होते मात्र दोन्ही चित्रपटांना ऑस्करच्या यादीतून वगळ्यात आले आहे.