छेलो शो
मुंबई, 13 ऑक्टोबर : ऑस्कर नामांकनासाठी भारताकडून यंदा ‘छेलो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. भारतातून आजवर अनेक चित्रपटांना ऑस्करसारख्या चित्रपट क्षेत्रातील जगातील सर्वांत प्रतिष्ठित पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. पण ‘छेलो शो’ या चित्रपटाचं नामांकन विशेष मानलं जातं आहे. कारण चित्रपट बनवताना दिग्दर्शक पॅन नलिन यांना अनेक अग्निदिव्यांतून जावं लागलं. शिवाय या चित्रपटाच्या कथेचा बराचसा भाग हा पॅन नलिन यांच्या बालपणीच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारा आहे. ‘छेलो शो’ या चित्रपटाचा ऑस्करपर्यंत पोहोचण्याचा प्रवास नलिन यांनी सांगितला आहे. ‘आज तक हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलं आहे. पॅन नलिन यांनी स्वतंत्र चित्रपटांद्वारे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडमध्ये ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’नंतर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त झाली. आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना नलिन म्हणाले की, डिस्ट्रिब्युटरकडे गेल्यानंतर चित्रपटाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया पाहून चित्रपटात व्यक्त झालेल्या भावना जागतिक स्तरावरच्या असल्याचं जाणवत होतं. त्यामुळे स्वतंत्र प्रादेशिक चित्रपट असलेल्या ‘छेलो शो’ चे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होईल, असा विश्वास होता. यातूनच हा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाठवता येईल असं वाटलं होतं. परंतु हा चित्रपट ऑस्करपर्यंत जाणं म्हणजे माझ्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक आहे. स्पेनमध्ये वालाडोलिडच्या 67 व्या चित्रपट महोत्सवात पुरस्कार जिंकल्यानंतर या चित्रपटात काही खास असल्याचं वाटत होतं. चित्रपटाला ट्रिबेका, चीनमध्ये दोन नामांकन आणि कोरियामध्ये मुलांच्या ज्युरीमध्येही पसंती मिळाली. शिवाय स्वित्झर्लंडच्या चित्रपट महोत्सवात मुलांकडून या चित्रपटाचं कौतुक झाल्यानं आत्मविश्वास आपोआप दुणावला. हेही वाचा - रणवीर बनला नीरज चोप्राचा टीचर; या गोष्टीचे देतोय धडे, पाहा VIDEO ओटीटीपेक्षा चित्रपटगृहात रिलिजला दिलं महत्त्व नलिन म्हणाले की, चित्रपटाची निर्मिती सुरू असताना अचानक कोरोनाचा शिरकाव झाला. पुढे काय होणार याची भीती होती. चित्रपटगृह उघडतील की नाही हे कळत नव्हतं; पण चित्रपटाचा आशयच सिनेमागृहाशीसंबंधित असल्यानं तिथंच हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर मी ठाम होतो. बहुतांश जणांनी चित्रपट ओटीटीला विकण्यास सांगितलं; पण मी चित्रपटगृह उघडण्याची प्रतीक्षा करत होतो. चित्रपट ओटीटीवर आणण्याचं नियोजनही केलं नाही. चित्रपटाची कथा दिग्दर्शकाच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या कथेबद्दल बोलताना नलिन म्हणाले, ‘या चित्रपटाच्या कथेचा बराचसा भाग हा माझ्या जीवनावर आधारित आहे. चित्रपट दिग्दर्शक होण्याआधीपासून मी एक फिल्मी कीडा आहे. चित्रपट पाहणं मला खूप आवडतं. अनेकदा माझे सहकारी मला म्हणतात की, तुम्हाला प्रत्येक चित्रपट कसा काय आवडतो. परंतु, मला स्वत: प्रत्येक प्रकारचा चित्रपट आवडतो. हा चित्रपट बनवताना अनेकदा भावनिक घालमेल झाली. कारण या चित्रपटातील कथेतील बहुतांश भाग माझ्या खासगी आयुष्यावर आधारित होता.’ ‘लहान असताना अनेक कष्ट भोगले आहेत. चित्रपटात वापरलेला गल्ला, टिफिन, जेवण करतानाच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टी, देवी लक्ष्मीचा तो फोटो अशा अनेक वस्तू मी सांभाळून ठेवल्या होत्या. चित्रपटातील त्या वस्तू माझ्या बालपणाचा भाग असल्यानं अनेकदा त्यावर आधारित प्रसंग शूट करताना मला वेळ लागायचा. सुरुवातीला हा चित्रपट वैयक्तिक वाटायचा. पण जसजसा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचू लागला तसं त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. फिल्ममेकर म्हणून मी स्वत: नेहमी मुक्तपणे विचार करतो. चित्रपट एकदा प्रदर्शित झाला, की तो आपला राहत नाही. तो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल की नाही, पुरस्कार मिळेल अथवा नाही याचा विचार फारसा न केलेला बरा,’ असंही नलिन म्हणाले. नलिन म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांतील गरिबी दाखवून तो मुद्दा एनकॅश करण्याचा प्रयत्न सातत्याने काही दशकं केला जात आहे. त्यामुळे असा वेगळा आशय असलेले चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरतात. दिग्दर्शक गरिबीचा मुद्दा एनकॅश करतात. मी माझ्या बालपणात भोगलेल्या कष्टातून प्रेरणा घेऊन चित्रपट बनवत असेन तर मी त्यात कधी खोटं बोलणार नाही. स्टेशनजवळ माझ्या वडिलांचा चहाचा स्टॉल होता. आजही माझे वडील तिथं काम करत आहेत. मी पैसे कमवत असल्याचं त्यांना अनेकदा सांगितलं; पण आजही एखादी रेल्वे गाडी थांबते तेव्हा ते आनंदी होतात. ते त्यांचं वेगळ जग आहे. आपण हे काम केलं नाही तर जगू शकत नाही, असं वडिल मला नेहमी म्हणतातही.’ खासगी आयुष्याबद्दल पुढे बोलताना नलिन म्हणाले की, गावात असेपर्यंत मी समधानी असल्याचं वाटायचं. पण अहमदाबादला आल्यावर कळालं की, आपण गरीब या आर्थिक वर्गात मोडतो. त्याचवेळी माझा संभ्रम दूर झाला. चित्रपटातील भाविनच्या पात्रातही तीच बाब आहे. भाविन गावात असतो तोवर त्याला वाटतं की, आपल्या जगात आपण आनंदी आहोत, हेच आपलं सुखी आयुष्य आहे. तो स्वत:ला श्रीमंत समजत असतो.’ हेही वाचा - ‘छेलो शो’ फेम बालकलाकाराचं निधन; चित्रपट रिलीजच्या 3 दिवस आधीच घडली दुःखद घटना आईनं मंगळसूत्र विकलं नलिन म्हणाले की, आजही मी जेव्हा गावी जातो तेव्हा एका खोलीचं घर पाहिलं की भावनिक होऊन जातो. आमच्या एका खोलीतच स्वयंपाक तयार होत होता, तिथंच आम्ही झोपायचो. चहाच्या स्टॉलवर वडील सात जणांचा उदरनिर्वाह चालवायचे. त्या काळात ते बरं वाटायचं; पण आता मॉडर्न मेंदूनं विचार करतो तेव्हा आता सर्वकाही अशक्यप्राय वाटतं. भारतीय पालक त्यांच्या अडचणी कधी मुलांसमोर मांडत नाहीत. मला शिकवण्यासाठी माझ्या आईनं मंगळसूत्रही विकलं होतं. मोठा झाल्यानंतर आईनं केलेला त्याग आज समजत आहे. चित्रपटाबद्दल बोलताना नलिन यांनी म्हटलं की, मी अनेक देशांत फिरलो. भारतातील गरीब लोक आनंद मिळवण्याच्या बाबतीत सर्वात श्रीमंत असल्याचा समज जगाच्या पाठीवर आहे. सिनेमा आणि गरिबीबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा संभ्रम निर्माण होतो. पण तुमचा हेतू सर्वांत महत्त्वाचा असतो. चित्रपटाच्या कथेसोबत प्रामाणिक राहणं गरजेचं असतं. लोकांना चांगल्या कथा आवडतात, हेच खरं आहे. सिटी ऑफ गॉड या चित्रपटाचं उदाहरण देऊन नलिन म्हणाले की, तो चित्रपट खूप छान होता. त्याच धर्तीवर 50 पेक्षा अधिक चित्रपट आले. पण त्यातील एकही चित्रपट चालला नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणालाही गरिबीची चिंता नाही, असं मानणं चुकीचं आहे. चित्रपट दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटात गरिबी दाखवून ते एनकॅश करण्याचा प्रयत्न करत असतील तर आज प्रत्येक स्वतंत्र दिग्दर्शक श्रीमंत झाला असता. आफ्रिकन चित्रपट दिग्दर्शकही कोट्यवधी रुपये कमवू शकले असते. चित्रपटासाठी विकावं लागलं घर ‘छेलो शो’ हा चित्रपट बनवताना पुरेसे पैसे नसल्यानं मुंबईमधील बोरिवलीत एक अपार्टमेंट त्यांना विकावी लागल्याचं नलिन यांनी सांगितलं. त्यानंतर एक फायनॅन्सर माझ्यासोबत जोडला गेला. कान्समध्ये जाऊन आम्ही चित्रपट दाखवला. तिथेच डिस्ट्रिब्युटरचा शोध सुरू केला आणि अशाप्रकारे लोक आमच्याशी जोडले गेले असंही नलिन यांनी सांगितलं.