मुंबई, 3 सप्टेंबर- अभिनेता विवेक ओबेरॉय हा बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक होता. हँडसम हंक अशी ओळख असलेल्या विवेकवर मुली जीव ओवाळून टाकायच्या. विवेकने 2002 साली रामगोपाल वर्मा दिग्दर्शित कंपनी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करिअरमध्ये सर्व अगदी सुरळीत सुरू असताना त्याने एक चूक केली आणि ती चूक त्याला खूप महागात पडली. आज 3 सप्टेंबर रोजी विवेकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊयात. सलमान खानसोबत रिलेशनशिप करण्यापूर्वी ऐश्वर्या राय मॉडेल राजीव मूलचंदानीला डेट करत होती. मॉडेलिंगच्या काळात दोघं जवळ आले होते, पण नंतर दोघांचं ब्रेकअप झालं. यादरम्यान ऐश्वर्या आणि सलमानची ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या सेटवर भेट झाली होती. नंतर 1999-2001 या काळात दोघांनी एकमेकांना डेट केलं; पण लवकरच दोघांमध्ये मतभेद होऊ लागले. पुढे ऐश्वर्याने हे नातं संपवण्याचं ठरवलं, पण ते सहजासहजी संपलं नाही. ऐश्वर्यापासून वेगळं झालेल्या सलमानला राग कंट्रोल करता येत नव्हता. ऐश्वर्या चित्रपटांचं शूटिंग करत असताना सलमान सेटवर जाऊन गोंधळ घालायचा, यामुळे ऐश्वर्या कंटाळली होती. सलमान खानपासून वेगळी झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉयची एंट्री झाली. ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटात एकत्र काम करताना दोघांना एकमेकांबद्दल प्रेमाची भावना जाणवली. विवेकने ऐश्वर्याच्या 30व्या वाढदिवसाला 30 गिफ्ट दिली होती. ऐश्वर्याने विवेकबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं कधीच जाहीर केलं नाही, पण दोघंही प्रत्येक फंक्शनमध्ये सोबत जायचे. त्यावरून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा होत होती. यादरम्यान विवेकने एका हॉटेलच्या खोलीत पत्रकार परिषद बोलावली आणि त्याला सलमानकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं उघड केलं. एवढंच नाही, तर सलमानने त्याला 42 वेळा फोन केल्याचंही सांगितलं. या पत्रकार परिषदेनं विवेकचं करिअर संपल्यात जमा झालं. जिच्यासाठी विवेकने एवढं मोठं पाऊल उचललं, तिनेही विवेकची साथ सोडली. (हे वाचा: Liger फ्लॉपचा कलाकारांसोबत वितरकांना मोठा फटका, भरपाईसाठी उचललं मोठं पाऊल ) झालेल्या प्रकाराशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हणत ऐश्वर्या विवेकपासून दूर झाली. त्यानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही विवेकच्या हातातून गेल्या. सलमान खान इंडस्ट्रीतील एक मोठा स्टार होता तर विवेकने नुकतंच त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. सलमानशी वाद नको म्हणून फिल्म इंडस्ट्रीतील कोणीही त्याला चित्रपटात काम देत नव्हतं. या घटनेनंतर विवेकच्या करिअरवर परिणाम झाला. दरम्यान, विवेकने अनेकदा सलमानची जाहीर माफी मागितली आहे. परंतु, त्याचा त्याच्या करिअरला विशेष फायदा झाला नाही.