विवेक अग्निहोत्री
मुंबई, 21 फेब्रुवारी- ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्थापन केलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे दर वर्षी त्याचं वितरणं होतं. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला मिळाला आहे. सोमवारी (20 फेब्रुवारी) रात्री मुंबईमध्ये झालेल्या वितरण सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर याबाबत मोठ्या अभिमानानं घोषणा केली. ट्विटसोबत त्यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यातील काही फोटोही पोस्ट केले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नेयाबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात 1990 मधील काश्मिरी पंडित समाजाला सहन करावा लागलेली हिंसा, वेदना आणि संघर्षाचं चित्रण करण्यात आलं आहे. यात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर आणि इतर कलाकारांनी अभिनय केला आहे. अनेक वादांचा सामना करून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनाही टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र, आता याच चित्रपटाला प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानं ते आनंदी झाले आहेत. ( हे वाचा: Dadasaheb Phalke Award: ‘रेखाच अधिक सुंदर..’, आलिया-रेखा यांच्या VIRAL VIDEO वर कमेंट्सचा वर्षाव ) अग्निहोत्री यांनी पुरस्कार हातात धरल्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिलं, “#काश्मीरफाइल्सने #दादासाहेबफाळकेपुरस्कार2023, या पुरस्कार सोहळ्यात ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार जिंकला. हा पुरस्कार दहशतवादातील सर्व पीडितांना आणि आशीर्वाद देणाऱ्या भारतातील सर्व लोकांना समर्पित आहे.” विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ही बातमी शेअर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनीही कमेंट करून चित्रपटाच्या टीमचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी लिहिलं, “अभिनंदन विवेक जी .. @अनुपमखेर, #मिथुनदा, आणि @दर्शनकुमार यांच्या उत्कृष्ट अभिनयासह #काश्मीरफाइल्स हा अतिशय सुरेख रचना केलेला चित्रपट होता.”
अभिनेते अनुपम खेर यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर पुरस्कार मिळालेल्या आपल्या संपूर्ण टीमचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, “#काश्मीरफाइल्स #कार्तिकेया2 आणि #उँचाईसाठी #वर्षातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्याच्या पुरस्कारानं मला सन्मानित केल्याबद्दल #दादसाहेबफाळकेफिल्मफेस्टिव्हलचे आभार. हा पुरस्कार मी माझ्या प्रेक्षकांना समर्पित करतो! मी स्वप्न पाहणं आणि कठोर परिश्रम करणं सुरू ठेवेन. #दकाश्मीरफाइल्सला #सर्वोत्कृष्टचित्रपटाचा पुरस्कार मिळाला याचा अभिमान आहे.”
चाहत्यांनीदेखील चित्रपटाच्या टीम आणि दिग्दर्शकावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं कमेंट केली, “अभिनंदन. तुम्ही यासाठी योग्य आहात. अप्रतिम दिग्दर्शन केलं आहे. लोकांच्या डोळ्यांमध्ये अंजन घालणारे सिनेमे बनवत राहा”. आणखी एकानं कमेंट केली आहे की, ‘संपूर्ण टीम आणि स्टारकास्टचे हार्दिक अभिनंदन. तुम्हा सर्वांना एकत्र आनंद साजरा करताना बघायला उत्सुक आहे.’ आणखी एका युजरनं कमेंट केली, “सत्य समोर आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केल्याबद्दल तुमचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन.”