मुंबई, 16 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या का केली, याचा तपास मुंबई पोलिसांना लागला नाही आहे. मुंबई पोलीस या प्रकरणात प्रत्येक बारकावे तपासून पाहत आहेत. मात्र कोणताही ठोस पुरावा त्यांच्या हाती लागला नाही आहे. दरम्यान या एकंदरीत प्रकारची CBI चौकशी व्हावी अशी मागणी त्याचे चाहते करत आहेत. सोशल मीडियावर त्यासंदर्भातील काही हॅशटॅग देखील ट्रेंडिंग आहेत. सुशांतचा न्याय द्यावा अशी मागणी त्याचे चाहते करत आहेत. दरम्यान आता भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी CBI मार्फत व्हावी अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. या प्रकरणाशी संबंधित नेमणूक करण्यात आलेले वकील ईशकरण सिंह भंडारी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी स्वामी यांचे पत्र देखील सोशल मीडियावर शेअर केले आहे.
स्वामी यांनी त्यांच्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘तुम्हाला सुशांत सिंह राजपूतच्या अचानक जाण्याबाबत माहित असेलच. त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते याबाबत माझे असोसिएट ईशकरण भंडारी यांनी काहीसा रिसर्च केला आहे. एफआयआर नोंदवून पोलीस अद्याप परिस्थितीचा शोध घेत असले तरी, मुंबईतील माझ्या सूत्रांकडून मला समजले की दुबईतील डॉनचा पाठिंबा असलेली बॉलिवूड फिल्म जगातील बरीच मोठी नावे पोलिसांकडून या प्रकरणाच्या कव्हरअपची खात्री करुन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ज्यामुळे राजपूत यांच्या निधनाचे कारण आत्महत्या असेच होईल.’ दरम्यान मुंबई पोलिसांकडून यासंदर्भातील शोधकार्य लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.