मुंबई, 23 सप्टेंबर- गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी गुड न्यूज दिली आहे. यामध्ये आलिया भट्टपासून ते अभिनेत्री बिपाशा बसूचादेखील समावेश आहे. बिपाशा बसूने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लवकरच आई बनणार असल्याची गोड बातमी देत सर्वानांच खुश केलं आहे. त्यानंतर अभिनेत्री सतत आपले प्रेग्नेन्सीदरम्यानचे अनुभव आणि बेबी बम्पसोबतचे सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान आता लवकरच अभिनेत्रीचं डोहाळजेवण केलं जाणार आहे. याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. नुकतंच याबाबतचा रिपोर्ट समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी लवकरच आई बनणार असणाऱ्या आलिया भट्टच्या डोहाळ जेवणाची बातमी समोर आली होती. आलियाची आई सोनी राजदान आणि सासू नीतू कपूर अभिनेत्रींच्या डोहाळ जेवणाची जय्यत तयारी करत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान आता अभिनेत्री बिपाशा बसूच्या डोहाळ जेवणाचं वृत्त समोर आलं आहे. त्यामुळे सध्या प्रत्येकजण याचीच चर्चा करत आहे. बिपाशा बसू पहिल्यांदाच आई बनणार आहे. बिपाशा आणि पती-अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आपल्या पहिल्या अपत्यासाठी फारच उत्सुक आहेत. ते सतत सोशल मीडियावर आपला आनंद आणि उत्सुकता व्यक्त करत असतात. पाठवली निमंत्रण पत्रिका- बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी फारच उत्सुक आहेत. बिपाशाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा अशी करणची इच्छा आहे. त्यामुळेच या दोघांनी मिळून डोहाळ जेवनाचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. ई टाइम्सच्या वृत्तानुसार, बिपाशा आणि करणने आपल्या कार्यक्रमासाठी मित्र आणि नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यास सुरुवात केली आहे. तसेच कोरोनासारख्या रोगराईला लक्षात ठेऊन येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला योग्य ती दक्षता घेण्यास सांगण्यात आलं आहे. जेणेकरून येणाऱ्या बळावर आणि आईच्या प्रकृतीवर कोणताही परिणाम होऊ नये. **(हे वाचा:** Ira Khan:आमिर खानच्या लेकीला बॉयफ्रेंडने केलं हटके प्रपोज; मग घातली अंगठी,पाहा VIDEO ) पार्टीसाठी खास ड्रेसकोड- बॉलिवूड पार्टी म्हटलं की ड्रेसकोड आवर्जून येतो.बिपाशा बसूच्या डोहाळ जेवणामध्येसुद्धा ड्रेसकोड ठरवण्यात आल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. या पार्टीसाठी महिला सेलेब्रेटींना पिंक किंवा पीच रंगाचा ड्रेस परिधान करावा लागणार आहे. तर पुरुष मंडळींना ब्ल्यू किंवा लव्हेंडर कलरचा आऊटफिट घालावा लागणार आहे. या पार्टीसाठी फक्त 20 ते 25 जवळच्या लोकांना बोलावण्यात आलं आहे. सोशल मीडियावर बिपाशाच्या डोहाळ जेवणाचं वृत्त आल्यापासूनच चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.