अमृता देशमुख-प्रसाद जवादे
मुंबई, 3 जानेवारी- छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि तितकाच विवादित शो म्हणून बिग बॉसला ओळखलं जातं. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ‘ बिग बॉस मराठी सीजन 4' सध्या आपल्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच शेवटच्या आठवड्यात येऊन अवघे काही दिवस राहिले असताना अभिनेता-स्पर्धक प्रसाद जवादे घराबाहेर पडला आहे. प्रसाद जवादे हा बिग बॉसच्या चौथ्या सीजनचा एक स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. परंतु त्याच्या घराबाहेर जाण्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. प्रसाद जवादे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याला चाहते सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्याचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रसाद घराबाहेर आल्यानंतर अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे. घरातील आपले अनुभव, स्पर्धकांसोबतचं आपलं नातं, स्पर्धा किती कठीण होती या सर्व विषयांबाबत संवाद साधत आहे. नुकतंच प्रसादने राजश्री मराठीच्या वेबसाईटला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्याने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टींबाबत खुलासा केला आहे. **(हे वाचा:** Prasad Jawade : …अन् प्रसाद जवादेचा बिग बॉसचा प्रवास संपला, बाहेर पडताच अश्रू अनावर ) या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद जवादेला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. प्रसादने सुद्धा या प्रश्नांची अगदी मनमोकळेपणाने उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीदरम्यान प्रसादला विचारण्यात आलं होतं की, ‘घरातून बाहेर आल्यानंतर तू अमृता देशमुखला भेटणार का? यावर उत्तर देत प्रसादने म्हटलं, ‘अरे का नाही? खरं तर मला सर्वात पहिला फोन तिला करायला आवडेल. याबाबत बोलताना प्रसाद म्हणाला, गेल्या काही दिवसांपासून अमृता माझ्या आयुष्यातील एक आश्चर्यकारक भाग बनली आहे. बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासून माझी बाजू घेणारी कोणती व्यक्ती असेल तर ती फक्त अमृता देशमुख होती’.
‘त्यामुळे मला अमृताला भेटायला आवडेल. आणि आमच्या दोघांमध्ये घरात एक छान बॉन्डिंग होतं. माझ्या गोष्टी तिला चांगल्या प्रकारे समजत होत्या. त्यामुळे मला तिच्या संपर्कात राहायला आवडेल. असं म्हणत प्रसाद जवादेनं अमृता आणि त्याच्या चाहत्यांना खुश केलं आहे. यावेळी प्रसादने घरातील विविध विषयांवर गप्पा मारल्या. शिवाय अपूर्वाबाबत बोलताना त्याने म्हटलं, मला तिच्याकडून कॉफीची ऑफर मिळाली आहे. पुढे चेष्टा करत प्रसाद म्हणाला, इतक्या सगळ्या भांडणानंतर कॉफी कोण ऑफर करतं निदान जेवणासाठी तर विचारायला हवं’. आणि पुढे आम्ही ठरवू भेटू असा अंदाजही त्याने बांधला आहे.
बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीजनचा स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून प्रसाद जवादेकडे पाहिलं जात होतं. अनेकांनी प्रसाद जवादेला सोशल मीडियावर चौथ्या सीजनचा विजेता म्हणून घोषित केलं होतं. पण शोमधून त्याच्या अनपेक्षित एक्झिटने सर्वच निराश झाले आहेत. सध्या बिग बॉस शेवटच्या आठवड्यात पोहोचला आहे. लवकरच या सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे या पर्वाचा विजेता नेमका कोण ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.