Amitabh Bachchan
मुंबई, 24 फेब्रुवारी- बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bchchan) आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुंबई उच्च न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अमिताभ बच्चन यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेसमोर (BMC) आपली बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे. यासोबतच उच्च न्यायालयाने बीएमसीला अमिताभ बच्चन यांच्यावर सध्या कोणतीही कारवाई करू नये, असे आदेशही दिले आहेत. एएनआयने केलेल्या ट्विटनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने बच्चन कुटुंबीयांना दोन आठवड्यांत बीएमसीकडे निवेदन सादर करण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे बीएमसीला सहा आठवड्यांत या निवेदनावर विचार करण्याचे आदेश दिले आहेत. काय आहे नेमका वाद? अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांनी बीएमसीच्या नोटीसविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अमिताभ बच्चन यांना 20 एप्रिल 2017 रोजी बीएमसीने नोटीस बजावली होती की त्यांच्या प्रतीक्षा बंगल्याचा काही भाग रस्त्याच्या भागात येतो आणि बीएमसीला तो भाग ताब्यात घ्यायचा आहे. या नोटिसला उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, बीएमसी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने ते सहज रुंद करू शकते'.
हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत बच्चन कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले आहे की, बीएमसीने 28 जानेवारी 2022 पर्यंत 4 वर्षे 9 महिन्यांत नोटीस देऊनही पुढील कारवाई केलेली नाही. अशा परिस्थितीत ही नोटीस रद्द करण्यात आली असेल असं बच्चन कुटुंबीयांना वाटलं होतं. परंतु 28 जानेवारी 2022 रोजी बीएमसी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की नोटीसमध्ये सांगितलेल्या सर्व प्रस्तावांची अंमलबजावणी केली जाईल आणि लवकरच जमीन संपादित केली जाईल.