मुंबई, 11 सप्टेंबर : अभिनेते अमिताभ बच्चन सध्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमातील अनेक किस्से सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यासोबतच अमिताभही त्यांचे जुने किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करताना पहायला मिळतात. नुकतेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर बिग बींनी त्यांची एक आठवण शेअर केली. शुक्रवारी नवीन कुमार नावाचा स्पर्धक फास्टेस्ट फिंगर फर्स्ट जिंकून हॉट सीटवर आला. त्याच्या दुसऱ्या प्रश्नात शेळी, गाय, साप आणि वाघाचे चित्र होते. नवीन कुमारने सांगितले की, साप पाहिल्यानंतर त्याला ताप येतो. यावेळी साप पाहून मलाही ताप येतो असं अमिताभ म्हणाले. अमिताभ बच्चन यांना त्यांचे शूटिंगचे दिवस आठवले. बिग बींनी सांगितले की, ‘एका चित्रपटातील दृश्यानुसार माझ्या छातीतून साप बाहेर यायला हवा होता. हे दृश्य ऐकून माझ्या संवेदना उडाल्या. माझ्यासाठी हा एक मरणारा क्षण होता. मी हा सीन करू शकणार नाही असे मी दिग्दर्शकाला सांगितले. या दिग्दर्शकाने सांगितले की तो रबरी साप समोर ठेवणार आहे, ज्यात डायलॉग्स बोलावे लागतील. त्यानंतर मी सीनसाठी तयार झालो’. हेही वाचा - Tina Datta: अभिनय सोडून भाजीपाला विकतेय अभिनेत्री? फोटो पाहून चाहते बुचकळ्यात अमिताभ पुढे म्हणाले की, ‘मला साप देण्यात आला आणि तो धरून ठेवताना मी खूप छान डायलॉग दिले. सीन संपल्यावर सगळ्यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या. सीननंतर असिस्टंट डायरेक्टरने सांगितले की हा साप खरा आहे, रबरचा नाही. हे ऐकून मला धक्काच बसला’. त्यांचा हा किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. सोशल मीडियावरही याची चर्चा रंगलेली पहायला मिळतेय. दरम्यान, सोनी टीव्हीवर प्रदर्शित होणारा रिअॅलिटी क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ भारतातील अनेकांचा आवडता शो आहे. आत्तापर्यंत या शोचे 13 सीझन यशस्वीरित्या पूर्ण झाले असून सध्या 14 वा सीझन चांगलाच गाजत आहे. यावेळीही ‘कौन बनेगा करोडपती 14’ च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी यावेळीही बिग बी अमिताभ बच्चनच सांभाळत आहेत.