मुंबई, 18 सप्टेंबर- ‘झलक दिखला जा’ पुन्हा एकदा टीव्हीवर परतला आहे. ‘झलक दिखला जा 10’ हा सीजन प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. हा डान्स रिऍलिटी शो तब्बल 5 वर्षानंतर टीव्हीवर परतला आहे. बॉलिवूड दिग्दर्शक-निर्माता करण जोहर, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि नोरा फतेही या शोचं परीक्षण करत आहेत. यामध्ये सहभागी प्रसिद्ध सेलिब्रेटी आपल्या डान्सने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये स्पर्धक कॉमेडियन अली असगरच्या मुलांनी त्याच्यासाठी खास एक व्हिडिओ संदेश पाठवला होता. त्यामुळे अली भावुक झालेला दिसून आला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. कलर्स टीव्हीने झलक दिखला जाचा एक प्रोमो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. या प्रोमोमध्ये अली असगर त्याच्या डान्स पार्टनरसोबत राजकुमार राववर चित्रित केलेल्या ‘मिलेगी मिलेगी’ गाण्यावर परफॉर्म करताना दिसत आहे. त्याच्या डान्स परफॉर्मंसनंतर स्टेज स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले केला जातो. या व्हिडिओमध्ये अली असगरचा मुलगा आणि मुलगी दिसून आले. इतकंच नव्हे तर त्यांनी अलीसाठी एक खास संदेशही दिला. दरम्यान अलीच्या लेकीने एक कटू सत्य सांगत म्हटलं की, तिच्या वडिलांच्या स्त्री पात्र साकारण्याने लोक शाळेत तिची खिल्ली उडवतात. ती म्हणाली, “आमच्या शाळेतील मित्र आम्हाला चिडवायचे. तुला दोन आई आहेत असे म्हणायचे. तू आज्जीची मुलगी आहेस किंवा मुलाला तू आज्जीचा मुलगा आहेस असे टॅटूही बनवायचे’. या कटू आठवणी ऐकून अली असगरच्या डोळ्यात अश्रू तरळले. अली असगरची लेक पुढे म्हणाली, “बाबा स्वतःची खिल्ली उडवून इतरांना हसवण्याचं काम करत आहेत. हे प्रत्येकाला जमत नाही. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो बाबा.” हे ऐकून अली भावुक होतो. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. अली असगर स्टेजवर स्वतःला सावरताना दिसून येत आहे. यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितनेही अलीला सॅल्यूट केलं. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. प्रेक्षक अलीचं प्रचंड कौतुक करत आहेत.
**(हे वाचा:** Jhalak Dikhhla Jaa: गश्मीर महाजनीवर होतं कर्जाचं डोंगर; कटू आठवणी सांगत अभिनेत्याची आई झाली भावुक ) अली असगर हा प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता आहे. त्याने अनेक रिऍलिटी शो आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अली असगरने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आजीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेद्वारे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्याने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. ज्यामध्ये तो अनेकदा आजीच्या लूकमध्ये दिसला होता. अलीची आजीची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. परंतु त्यामागचं हे कटू सत्य आज पहिल्यांदाच समोर आलं आहे.