शाहरुख खान
मुंबई, 8 डिसेंबर : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान हे सतत चर्चेत असलेलं नाव आहे. अनेक कारणांमुळे त्याची चर्चा सुरू असते. गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या सेटवरचे शाहरुखच्या लूकचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या चाहत्यांमध्ये पठाण सिनेमाच्या रिलीजच्या तारखेबद्दल उत्सुकता आहे. दरम्यान, निर्मात्यांनी या चित्रपटाचं नवीन पोस्टर चाहत्यांशी शेअर केलं आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्याचं दिसत आहे. काही जण चित्रपटाचा ट्रेलर लवकर रिलीज करण्याची विनंती करत आहेत, तर काही जण चित्रपटातल्या नवीन गाण्याच्या रिलीजची तारीख शेअर करण्याची मागणी करत आहेत. काही चाहत्यांनी अद्याप गाणी रिलीज न झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. शाहरुख खानसह अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमदेखील या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटाच्या मेकर्सनी नवीन पोस्टर्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच एक नवीन पोस्टर शेअर करण्यात आलं. ‘गेट सेट बूम. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात मोठ्या स्क्रीनवर ‘पठाण’ बघण्यासाठी तयार व्हा’, अशा कॅप्शनसह पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. हा चित्रपट हिंदी, तमीळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होत आहे. पोस्टरवर ‘अपनी कुर्सी की पेटी बांध लो’ असंही लिहिलेलं आहे. या पोस्टरवरचा शाहरुखचा लांब केसांमधला लूक चाहत्यांना फार आवडला आहे; मात्र काही जण या पोस्टरच्या रिलीजनंतर संताप व्यक्त करत आहेत.
पठाण या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज होताच चाहत्यांच्या उत्सुकतेची पातळीही वाढली आहे; मात्र एकामागून एक पोस्टर पाहून चाहत्यांचा संतापही वाढत आहे. ‘गाणी केव्हा येतील, गाणी लवकरात लवकर रिलीज करा,’ अशा कमेंट्स करून शाहरुखचे चाहते चित्रपटातली गाणी रिलीज करण्याची विनंती करत आहेत. अद्याप चित्रपटातली एकही गाणं रिलीज झालं नाही. त्यामुळे निर्मात्यांवर संताप व्यक्त केला जात आहे.
शाहरुख खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारासोबत ‘जवान’ आणि तापसी पन्नूसोबत राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’ या चित्रपटात तो दिसणार आहे. म्हणजेच 2023 हे वर्ष शाहरुखच्या चाहत्यांसाठी जबरदस्त असणार आहे.