मुंबई, 17 जुलै : अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) याच्याकडून करण्यात येणाऱ्या मदतीचे सत्र अद्यापही सुरू आहे. हजारो मजूरांना स्वखर्चाने आपापल्या घरी पाठवणाऱ्या सोनूचे नाव आता पुन्हा चर्चेत आहे आहे. मुंबई पोलिसांना सोनू सूदने 25,000 फेस शिल्डची मदत केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. त्यांनी सोनूने केलेल्या या मदतीबाबत त्याचे आभार मानले आहेत. सोनूबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली आहे.
सोनू सूद कोरोनव्हायरस साथीच्या आजाराच्या वेळी गरजू लोकांना मदत करण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहे. लॉकडाऊन दरम्यान परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी पोहोचण्यास मदत केल्याच्या अनुभव सांगणारे पुस्तक देखील तो लिहिणार आहे. “दिवसातील 16 ते 18 तास प्रवासी मजुरांच्या सानिध्यात राहून त्यांचे दुःख वाटून घेतल्यानंतर, मागील साडेतीन महिन्यांचा काळा माझ्यासाठी एक प्रकारचा जीवन बदलणारा अनुभव आहे. जेव्हा मी त्यांना भेटतो, जेव्हा ते घरी परत जायला निघाले असतात त्यावेळी माझे मन आनंदाने भरून जाते. त्याच्या चेहऱ्यावर हास्य, त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू माझ्या आयुष्यातील सर्वात खास अनुभव ठरला आहे. मी त्या सर्वांना वचन दिले आहे की, तोपर्यंत काम करेन जोपर्यंत शेवटचा मजूर प्रवासी त्याच्या घरी परतत नाही’, सोनूने आयएएनएसशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे