मुंबई, 11 जानेवारी : अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आता आणखी एका व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. तुनिषा अली नावाच्या जिम ट्रेनरला डेट करत होती, असा दावा शीझानच्या वकिलांनी केला आहे. शीझानसोबत तुनिषाचं ब्रेकअप झाल्यानंतर तुनिषाने एक डेटिंग ऍप जॉईन केलं. या ऍपच्या माध्यमातून ती जिम ट्रेनर अलीला भेटली, असं शीझानचे वकील शैलेंद्र मिश्रा सुनावणीदरम्यान म्हणाले. तुनिषाने अली नावाच्या जिम ट्रेनरमुळे आत्महत्या केल्याचा दावा शीझानच्या वकिलांनी केला आहे. शीझानसोबत ब्रेकअप झाल्यानतंर तुनिषा अलीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोपही वकिलांनी केला आहे. दरम्यान शीझानच्या वकिलांच्या या आरोपांनंतर तुनिषाची आई कोर्टातच संतापल्या. माझी मुलगी गेली आहे, तुझं काहीच गेलं नाही, असं तुनिषाची आई म्हणाली. यानंतर तुनिषाची आई कोर्टातून रडत बाहेर आली. शीझानच्या जामिनावर 13 तारखेला निर्णय येण्याची शक्यता आहे. शीझानच्या वकिलांचा दावा ‘ज्या डॉक्टरांनी तुनिषाला बघितलं आणि तिचा तपास केला तो BHMS डॉक्टर आहे, या डॉक्टरांना अधिकार आहे का? 21 दिवसांच्या तपासानंतर शीझानविरुद्ध पोलिसांना कोणताही पुरावा मिळालेला नाही. शीझानने तुनिषासोबत चीटिंग केली नाही,’ असा युक्तीवाद शीझानच्या वकिलांनी केला. यादरम्यान शीझानच्या वकिलांनी सुनावणी इन कॅमेरा घेण्याची मागणी कोर्टासमोर केली.
‘आत्महत्येनंतर तुनिषाला हॉस्पिटलमध्ये न्यायला उशीर झाल्याचा दावा केला जात आहे. शुटिंग सेटजवळ BHMS डॉक्टर होता, पण या डॉक्टरांना चेक करण्याचा अधिकार नाही, त्यांच्याकडे व्हॅन्टिलेटर, आयसीयू आणि दुसरी उपकरणंही उपलब्ध नव्हती, त्यामुळे तुनिषाला हॉस्पिटलला न्यायला उशीर झाला, हे म्हणणं चुकीचं आहे,’ असं शीझानचे वकील म्हणाले.