प्रतिकात्मक फोटो
मुंबई 13 डिसेंबर : प्रेमप्रकरण, अनैतिक संबंध आणि लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या कारणांमुळे गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण अलीकडे वाढत आहे. उत्तर प्रदेशातलं अशाच प्रकारचं एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रेमसंबंधातून प्रेयसी गरोदर राहिली. यामुळे प्रियकर अस्वस्थ होता. त्याने प्रेयसीला गर्भपात करण्यास सांगितलं. परंतु, तिने नकार देताच चिडलेल्या प्रियकराने तिची गळा दाबून हत्या केली. हा प्रकार लपवण्यासाठी त्याने तिचा गळा ब्लेडने चिरला. या प्रकरणी प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातल्या मिर्झापूरमधील जिग्ना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मिश्रापूर गावातला तरुण विकास याने त्याच्या प्रेयसीची ब्लेडने गळा चिरून हत्या केली आहे. मिर्झापूरमध्ये 8 डिसेंबरला संध्याकाळी गंगा नदीकाठी एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याबाबत अधिक तपास केला असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या. हे दोघेही वयाच्या 18व्या वर्षी प्रेमात पडले आणि वयाच्या 19व्या वर्षी प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मिर्झापूरचे एसपी संतोष मिश्रा यांनी पत्रकारांना या घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, अटक करण्यात आलेला आरोपी विकास 19 वर्षाचा असून, त्याचे त्याच्या गावातल्या एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनाही त्यांच्या नातेवाईकांनी एकदा एकत्र पकडलंही होतं. एक दिवस प्रेयसीने प्रियकराला ती गरोदर असल्याची माहिती दिली आणि या प्रेमप्रकरणाला वेगळं वळण लागले. प्रेयसी गरोदर असल्याचे समजातच प्रियकर विकास अस्वस्थ झाला. त्याने तिला स्थानिक मेडिकलमधून गर्भपाताचं औषध आणून दिलं; पण प्रेयसीने औषध घेण्यास नकार दिला आणि ती त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणू लागली.
युवतीने गर्भपातासाठी नकार दिल्याने विकासची अस्वस्थता आणखी वाढली. त्याने तिला एक दिवस संध्याकाळच्या वेळी गंगा नदीकाठी भेटण्यासाठी बोलावले. प्रेयसी नदीकिनारी पोहोचताच दोघांमध्ये बाळाच्या अनुषंगाने जोरदार वाद झाला. वाद टोकाला पोहोचताच विकासने युवतीची गळा दाबून हत्या केली. ही घटना लपवण्यासाठी त्याने तिचा ब्लेडने गळा चिरला आणि मृतदेह घटनास्थळी सोडून तो फरार झाला. मृत युवती नगवासी गावातली रहिवासी आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मिर्झापूर एसपींनी एक पथक तयार केलं होतं. या पथकाने तपास आणि चौकशीच्या आधारे विकास याला अटक केली आहे. या वेळी त्याच्याकडून घटनेवेळी वापरलं गेलेलं ब्लेडदेखील जप्त करण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.