JOIN US
मराठी बातम्या / क्राईम / वीज तोडली म्हणून रेल्वे पोलीस भडकले; महावितरणाच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण

वीज तोडली म्हणून रेल्वे पोलीस भडकले; महावितरणाच्या कर्मचाऱ्याला केली मारहाण

महावितरण कर्मचाऱ्यानं वीज कनेक्शन कापल्याच्या रागातून एका रेल्वे पोलिसांने संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची (MSEDCL employee beaten by railway police) घटना अंबरनाथ याठिकाणी घडली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अंबरनाथ, 21 मार्च: सध्या राज्यात वीजबिल माफीवरून चांगलचं वातावरण तापतं आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक लोकांनी वीजबिल भरलं नाही. त्यामुळे अशा ग्राहकांविरूद्ध महावितरणाने कारवाईचा बडगा उगारला आहे. याचा एक भाग म्हणून ज्या लोकांनी वीजबिलं भरली नाहीत, अशा लोकांचे वीज कनेक्शन खंडीत (power supply cut) करण्याचं काम महावितरणाने सुरू केलं आहे. यामुळे महावितरणाचे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये संघर्ष उडत आहेत. अशातच महावितरण कर्मचाऱ्यानं वीज कनेक्शन कापल्याच्या रागातून रेल्वे पोलिसाने संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची (MSEDCL employee beaten by railway police) घटना अंबरनाथ याठिकाणी घडली आहे. अंबरनाथमधील एका रेल्वे पोलीसाचं वीजबिल थकल्यामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यानं त्याचं वीज कनेक्शन खंडीत केलं होतं. त्यामुळे संतापलेल्या रेल्वे पोलिसानं आपल्या मुलाच्या मदतीनं संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे. संबंधित घटना अंबरनाथमधील रॉयल पार्क याठिकाणी घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमधील राहुल इस्टेट परिसरातील रॉयल पार्क परिसरात रेल्वे पोलीस आनंद लोखंडे हे राहतात. गेल्या चार महिन्यांपासून त्याचं वीजबिल थकलं होतं. त्यामुळे  टेक्निशियन रुपेश जाधव यांनी महावितरणाच्या आदेशानुसार त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला होता. मात्र काही वेळाने लोखंडे यांनी वीज बिल भरल्यानंतर महावितरण अधिकाऱ्यांने त्यांची विजजोडणी पूर्ववत करण्याची सूचना दिली. यावेळी टेक्निशियन रुपेश जाधव हे रॉयल पार्क परिसरात काम करत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सहकाऱ्याला लोखंडे यांच्याकडे पाठवलं आणि त्यांचा वीज पुरवठा पूर्ववत केला.  ज्यांनी आमचा वीज पुरवठा खंडीत केला त्यांनाच बोलवा असा आग्रह रोल्वे पोलीस लोखंडे यांनी धरला. त्यांनतर आरोपी लोखंडे यांनी फोन कॉल करून टेक्निशियन रुपेश जाधव यांचा पत्ता शोधून काढला. यानंतर रेल्वे पोलीस लोखंडे हे त्यांच्या परिवारासह रॉयल पार्क परिसरात आले. हे ही वाचा - वीजबिल माफीवरून कोल्हापूरात शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन; राष्ट्रीय महामार्ग अडवला याठिकाणी त्यांनी महावितरणाचे टेक्निशियन रुपेश जाधव यांना शिवीगाळ करत त्यांना दोन कानाखाली मारल्या, तसंच लोखंडेच्या मुलानेही जाधव त्यांना मारहाण केली, असा आरोप रुपेश जाधव यांनी केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे स्वतः रेल्वे पोलीस लोखंडे आणि त्यांच्या मुलाने मारहाण केल्याचं जाधव यांनी सांगितलं असतानाही, पोलिसांनी गुन्हा केवळ आनंद लोखंडे यांचा मुलगा अमन लोखंडे याच्यावरच दाखल केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या