मुंबई, 22 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या उर्वशी हत्याकांडासंदर्भात मोठा खुलासा झाला आहे. उर्वशी वैष्णव हत्याकांडातील आरोपी रियाझ खान हा आधीच विवाहित होता. त्याला तीन बायका होत्या, अशी नोंद आहे. लग्नाच्या दबावामुळेच त्याने उर्वशीची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. पोलिसांनी मृताच्या ब्रँडेड सँडलच्या मदतीने खुनाच्या गुन्ह्याची उकल केली. काय आहे नेमकं प्रकरण - राजस्थानमधील रहिवासी असलेल्या 27 वर्षीय उर्वशीचा मृतदेह धामणी गावाजवळील गढी नदीत आढळून आला होता. उर्वशीचा गळा आवळून मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी मृताच्या सँडलवरून आरोपीचा शोध घेतला. आरोपी रियाजला तीन बायका असल्याची माहिती आहे. नवी मुंबई गुन्हे शाखा युनिट 2 चे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी याबाबत सांगितले की, “आम्ही मुख्य आरोपी, देवनारचा जिम ट्रेनर रियाझ खान आणि कुरिअर डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा त्याचा साथीदार इम्रान शेख याला अटक केली आहे. तसेच आम्ही मृतदेहाजवळ सापडलेल्या ब्रँडेड सँडलच्या मदतीने पीडितेची ओळख पटवण्यात आणि आरोपीचा शोध घेण्यात यशस्वी झालो,” असे ते म्हणाले. तसेच, ‘आम्ही नवी मुंबईतील सर्व पादत्राणांच्या दुकानात चौकशी केली आणि गेल्या आठवडाभरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. वाशीतील एका दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती 8 दिवसांपूर्वी भेटली होती. ती एका उंच माणसासोबत होती. तो बॉडीबिल्डरसारखा दिसत होता. आम्ही वाशी आणि कोपरखैरणे येथील सर्व जिम तपासल्या. अखेरीस आम्ही रियाझ खानला ओळखले, जो कोपरखैरणेच्या जिममध्ये ट्रेनर होता, अशी माहितीही पोलिसांनी दिली. हेही वाचा - ओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र…, अमरावतीच्या तरुणीसोबत काय घडलं? पाटील म्हणाले, ‘17 डिसेंबर रोजी आम्ही सापळा रचून रियाजला देवनार येथून अटक केली. त्याने उर्वशीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या उर्वशीसोबत रियाज हा रिलेशनशिपमध्ये होता आणि ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी मागे लागली होती. मात्र, त्याला लग्न करायचे नव्हते कारण त्याला आधीच तीन बायका होत्या. दरम्यान, या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.