खंडवा, 23 जानेवारी : सोशल मीडियावर ओळख लपवून मुलींना फसवण्याचे याआधी अनेक प्रकार समोर आले आहेत. यानंतर आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बंटी नाव सांगून एका जुनैद नावाच्या तरुणाने मुलीशी लगट करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पोलिसांत धाव घेतली. काय आहे संपूर्ण प्रकरण - खंडवाच्या जुनैदने छत्तीसगडच्या जगदलपूर येथील एका मुलीला शिकार बनवले. मुलीची फसवणूक झाल्यावर तिने खंडवा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार सांगितली. येथील सुनावणीनंतर मोघाट रोड पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवण्यात आली आहे. जगदलपूरमधील एका मुलीने इंस्टाग्रामवर बंटी नावाच्या मुलाला फॉलो केले आणि त्यानंतर दोघांमध्ये चॅट सुरू झाली होती. दोघाची मैत्री फुलली. यानंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. यानंतर डिसेंबरमध्ये ही तरुणी जगदलपूरहून खंडवा येथे आली असता, तरुणाने तिला शहरातील एका हॉटेलमध्ये थांबवले. तसेच तिच्यावर बलात्कार केला. मात्र, तोपर्यंत या तरुणाचे नाव जुनैद आहे, असे तिला माहिती नव्हते. लग्नाला दिला नकार - सुमारे आठवडाभर मुलगी खंडव्यात राहिली. यानंतर कसे तरी बंटी उर्फ जुनैदने तिची समजूत घालून तिला परत पाठवले. दोघे फोनवर बोलत राहिले आणि मुलीने लग्न करणार असल्याचे सांगितले. यावर आरोपीने माघार घेत मुलीशी बोलणे बंद केले. तसेच मुलगी पुन्हा खंडव्यात आल्यावर तिने बंटीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिला भेटण्यास नकार दिला. रविवारी तरुणीने खंडवा शहर पोलीस ठाणे गाठले. येथे तिने सोशल मीडियावरच्या या मैत्रीनंतर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, तपासादरम्यान, छिपा कॉलनीत मुलीवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. मोघाट रोड पोलिसांशी संपर्क साधून तरुणीला तेथे पाठवून तिच्या जबानीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर सोशल मीडियावरच्या मैत्रीमुळे तोटा झाल्याचे आणखी एक उदाहरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.