आगरा : पती-पत्नीमध्ये वाद झाले तर ते बोलून सोडवायचे असतात असं म्हटलं जातं. पण वाद विकोपाला गेले तर अनर्थ होतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोमधील भांडण विकोपाला गेलं आणि होत्याचं नव्हतं झालं. नवऱ्याच्या डोक्यात बायकोविषयीचा द्वेष वाढत गेला. त्याने पत्नी संतोषीला आपल्या बाईकवर फिरायला जाण्याच्या बहाण्याने बसवलं. ते यमुना नदीच्या पुलाजवळ आले. तिथे तिला उतरवलं आणि त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. सूडाने पेटलेल्या नवऱ्याने बायकोचा राग डोक्यात ठेवला आणि बदला घेण्याची भावना पेटली. त्याने बायकोला धक्का मारून नदीत ढकललं. सुदैवानं संतोषीला पोहोता येत असल्याने ती पोहत बाहेर पडली. तिने पोलीस ठाण्यात जाऊन हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. पत्नीला संपवण्याचा डाव आरोपीचा होता. मात्र तिला पोहता येत असल्याने त्याचा हा डाव फसला आणि तुरुंगात जाण्याची वेळ आरोपीवर आली. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी सिकंदरा पोलीस पुढील तपास करत आहेत.