बीड, 11 मार्च : अंबाजोगाई शहरातील बसस्थानक परिसरात मंदिरालगत 35 वर्षीय युवकाचा खून (Beed murder Case) झाल्याने खळबळ उडाली आहे. नितीन कैलास साठे असं मृत तरुणाचं नाव असून तो सिद्धार्थनगर येथील राहिवासी आहे. तरुणाचा मृतदेह रात्री बाराच्या सुमारास आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर, चेहर्यावर जखमा झाल्याच्या दिसून आल्याने खून झाल्याचा संशय पोलिसांनी (Beed Police) व्यक्त केला होता. या बाबतीत अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. 10 दिवसात गजबजलेल्या भागात 2 खुनाच्या घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अंबाजोगाई शहरात मागील अकरा दिवसापूर्वी गणेश मोरे आणि आज गुरुवारी नितीन साठे या दोन युवकांचा खून झाल्याच्या घटना घडल्याने शांत आणि सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या शहरात आता गुंडगिरी मोठया प्रमाणात वाढल्याचं दिसू लागलं आहे. नितीन साठे आणि राहुल या दोन युवकांमध्ये मागील आठ दिवसापूर्वी मारामारी झाली होती. मात्र प्रकरण तिथंल्या तिथे मिटल्याने त्यावर पडदा पडला. मात्र त्याच प्रकरणावरून दोन दिवसापासून दोघांमध्ये धुसफूस सुरू झाल्याने रात्री नितीनला यातील तीन आरोपींनी अज्ञात ठिकाणी डोक्यावर आणि चेहर्यावर धारदार शस्त्राने वार करून टॅक्सी पॉइंटच्या पाठीमागे आणून फेकून दिलं, अशी माहिती त्याच वेळी त्याच्या कुटुंबियांना समजली. त्यानंतर कुटुंबिय तेथे पोहोचेपर्यंत मारेकरी फरार झाले होते. नितीनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
नितीन एका पत्त्याच्या क्लबमध्ये काम करत होता. तेथील वादातूनच ही घटना घडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, शहरात सध्या अनेक प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने गुंडगिरी वाढली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दिवसाढवळ्या लोकवस्तीमध्ये घडलेल्या या दोन खुनाच्या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलिसांचा धाक आणि कायद्याचं भय राहिले आहे का नाही? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.