Weeding
रावळपिंडी - पाकिस्तानमध्ये महिलांच्या बाबतीत घडलेल्या दोन गुन्हेगारी कृत्यांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत वधूवर लग्नमंडपात गोळी झाडण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत पार्कमध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर बलात्कार झाला आहे. नववधू लग्नमंडपातून निघून थेट सासरच्या घरी पोहोचते. पण पाकिस्तानातील रावळपिंडी शहरात गोळी लागल्याने गंभीर जखमी झालेल्या नववधूला मंडपातून घाईघाईत रुग्णालयात न्यावं लागलं. पाकिस्तानमधील रावळपिंडी इथं रविवारी एका लग्न समारंभात एका तरुणाने वधूवर गोळी झाडून तिला जखमी केलं. समिती चौकाजवळील एका लग्नाच्या हॉलमध्ये एका तरुणाने वधूवर गोळीबार केल्याची घटना घडली. जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, लग्नातील पाहुण्यांनी या तरुणाला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. तर, जखमी वधूला रुग्णालयात नेण्यात आलं. या वृत्ताला दुजोरा देताना पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी संशयिताला ताब्यात घेतलं असून, त्याच्या ताब्यातून बंदूक जप्त केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाला त्या तरुणीशी लग्न करायचं होतं. मात्र तिच्या कुटुंबियांनी त्याचा प्रस्ताव नाकारला, त्यामुळे त्याने लग्नात तिच्यावर गोळीबार केला. दुसरीकडे इस्लामाबादमधील एका पार्कमध्ये दोन जणांनी एका महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, ही घटना गुरुवारी इस्लामाबादच्या एफ-9 भागात घडली. पीडित महिला एका पुरुष मित्रासोबत पार्कमध्ये फिरत होती तेव्हा जवळ शस्त्रे असलेल्या दोघांनी त्यांना थांबवलं आणि त्यांना जबरदस्ती जवळच्या झुडपात नेलं. एफआयआरचा हवाला देत पोलिसांनी सांगितलं की, त्यांनी महिलेला तिच्या पुरुष मित्रापासून वेगळं केलं. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तिला थोबाडीत मारली आणि आणखी सहा ते सात साथीदारांना घेऊन येण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि पीडितेला काय काम करतेस, असंही आरोपींनी विचारलं. तसेच तिला अशावेळी पार्कमध्ये येत जाऊ नकोस, असंही सांगितलं. या कृत्यानंतर आरोपींनी तिच्याजवळून घेतलेलं सामान तिला परत केलं आणि घटनेची वाच्यता कुठेही न करण्यासाठी तिला 1,000 पाकिस्तानी रुपयेदेखील दिले आणि नंतर ते पळून गेले. पीडितेने हिंमत एकवटली आणि त्याच रात्री 11:40 वाजता पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिला पाकिस्तान इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यात बलात्काराची पुष्टी झाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.