मंगळुरू, 03 एप्रिल: दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत प्रवास करतो, म्हणून एका युवकाला बेदम मारहाण केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. आरोपी युवकांनी बस आडवून एका युवकाला खाली उतरवून जबरी मारहाण (Young man beaten by goons) केली आहे. तसेच त्याच्यावर चाकूनेही हल्ला (Stabbed with knife) केला आहे. दरम्यान आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मध्ये पडणाऱ्या तरुणीलाही आरोपी युवकांनी मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत आहेत. मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशी कुमार यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलं की, संबंधित घटना कर्नाटक राज्याच्या मंगळुरू शहराच्या बाह्य परिसरात घडली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास काही लोकांनी बस आडवली आणि दुसऱ्या धर्माच्या युवतीसोबत प्रवास करणाऱ्या युवकाला खाली उतरवून त्याला जबरी मारहाण केली. विशेष म्हणजे संबंधित संबंधित युवक-युवती एकत्र शिक्षण घेत असून गेल्या काही वर्षांपासून ते दोघं एकमेकांना ओळखतात. पोलीस आयुक्तांनी पुढं सांगितलं की, या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी बंजरंग दलाशी जुडलेल्या अन्य चार जणांची नावं सांगितली आहेत. त्यांनी लवकरच अटक करू अशी माहितीही आयुक्तांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधून आलेल्या आरोपींनी रात्री साडे नऊच्या एक बस आडवली. त्यानंतर संबंधित युवकाला बसच्या खाली उतरवून थेट मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर आरोपींपैकी एकाने पीडित तरुणावर चाकूने हल्ला केला. यामध्ये पीडित तरुण गंभीर जखमी झाला. सध्या त्याला रुग्णालयात दाखल केलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हे ही वाचा- धुळ्यातील काँग्रेस भवनासमोर मृतदेह आढळल्याने खळबळ, मध्यरात्री झाली हत्या संबंधित मुलगी बंगळुरूला जात होती. तर तिचा मित्र तिची मदत करण्यासाठी तिच्यासोबत जात होता. संबंधित मुलीने सांगितलं की, पीडित मुलाला आपण गेल्या काही वर्षांपासून ओळखते. तसेच आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून हत्येच्या प्रयत्नाचे कलम लावण्यात आलं आहे. त्याचबरोबर आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत.