नवी दिल्ली, 28 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पालकांची चिंता वाढली आहे. या लाटेचा फटका लहान मुलांनाही बसताना दिसतो आहे. लहान मुलांना कोरोना झाल्याची प्रकरणं गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक आहेत. शिवाय लहान मुलांना कोरोनासह मल्टी-ऑर्गन इन्फ्लेमेटरी सिंड्रोमनेही (MIS-C - Multi organ inflammatory Syndrome) विळखा घातला आहे. गेल्या पाच दिवसांत मल्टी-ऑर्गन इन्फ्लेमेटरी सिंड्रोमचे 100 पेक्षा अधिक प्रकरणं समोर आली आहेत. इंडियन अकॅडमी ऑफ पिडियाट्रिक इन्सेन्टिव्ह केअरच्या (Indian Academy of Pediatric Intensive Care) डेटाचा हवाला देत हा रिपोर्ट दिला. उत्तर भारतात लहान मुलांमध्ये MIS-C मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कोरोना झालेल्या 4 ते 18 वयोगटातील मुलांमध्ये हा सिंड्रोम आहे. काही दुर्मिळ प्रकरणात 6 महिन्यांच्या मुलांनाही हा आजार झाल्याचं सांगण्यात आलं आहे, असं वृत्त एनडीटीव्ही ने दिलं आहे. हे वाचा - कमी ऑक्सिजनमध्येच ठणठणीत झाला कोरोना रुग्ण; DRDO च्या 2-DG औषधाची किंमत जारी फोर्टिस हेल्थकेअरमध्ये बालरोगतज्तज्ञ असलेल्या डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, MIS-C हा आजार मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांनी होतो. यामुळे लहान मुलांच्या जिवाला धोका आहे की नाही, हे मी सांगू शकत नाही. मात्र हा संसर्ग निश्चितपणे मुलांना अतिशय वाईट पद्धतीनं आपल्या विळख्यात घेतो. तो मुलांच्या हृदय (Heart), यकृत आणि किडनीवर (kidneys) थेट परिणाम करू शकतो. कोरोनाबाबत अनेकजण जास्त काळजी करत नाहीत. कारण बहुतेकांमध्ये याची हलकी लक्षणं दिसतात किंवा काहींना याचा फार त्रास होत नाही. मात्र कोरोनामुळे लहान मुलांमध्ये तयार होणाऱ्या अँटीबॉडीच अधिक घातक ठरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या अँटीबॉडीचा परिणाम लहान मुलांच्या शरीरावर होतो. यामुळे त्यांना अॅलर्जी होण्याची शक्यता अधिक असते, असं डॉ. गुप्ता यांनी सांगितलं. काय आहेत मल्टी-ऑर्गन इन्फ्लेमेटरी सिंड्रोमची लक्षणं तीन ते पाच दिवसांपर्यंत सतत ताप अवयव आणि टिश्यूंना सूज श्वास घ्यायला त्रास पोटात तीव्र वेदना ब्लड प्रेशर कमी होणं डायरिया त्वचा, नखांचं रंग निळसर होणं हे वाचा - भय इथले संपत नाही! फक्त कोरोनाच नव्हे तर आणखी 5 आजारांचं थैमान, परिस्थिती गंभीर रिपोर्टनुसार याआधी महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबमध्येही MIS-C ची प्रकरणं दिसून आली होती. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवावं असा सल्ला देण्यात आला आहे. जर अशी काही लक्षणं तुमच्या मुलांमध्ये दिसली तर त्यांना तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा.