मुंबई 14 मे : जालना (Jalna) जिल्ह्यातून नुकतंच एक प्रकरण समोर आलं आहे. यात एका 72 वर्षीय वृद्धाला लसीचा पहिला डोस (First Dose of Corona Vaccine) वेगळ्या तर दुसरा डोस वेगळ्या कंपनीचा दिल्याचं समोर आलं आहे. जालन्यातील रहिवासी असलेल्या दत्तात्रय वाघमारे यांना 22 मार्चला भारत बायोटेकच्या(Bharat Biotech) कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस दिला गेला होता. यानंतर 30 एप्रिलला त्यांना लसीचा दुसरा डोस कोविशील्डचा (Covishield) देण्यात आला. त्यांच्या मुलानं याबाबत खुलासा केला आहे. दत्तात्रय वाघमारे यांच्या मुलानं सांगितलं, की दुसरी लस घेतल्यानंतर माझ्या वडिलांना त्रास होऊ लागला. त्यांना ताप, शरीराच्या काही भागांवर फोड आणि अस्वस्थपणा जाणवू लागला. यानंतर आरोग्य केंद्रातून त्यांच्यासाठी औषधं आणली. त्यांची दोन्ही डोसची प्रमाणपत्र पाहिल्यानंतर लक्षात आलं की त्यांनी दोन वेगवेगळ्या लसी दिल्या गेल्या आहेत, असं मुलानं सांगितलं. दत्तात्रय यांच्या मुलानं म्हटलं, की मी आणि माझे वडील आम्ही दोघंही जास्त शिकलेलो नाही. त्यामुळे, आरोग्य कर्मचाऱ्यांनीच या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं होतं. सध्या लसींचा मोठा तुटवडा देशात जाणवत आहे. याचदरम्यान दोन्ही डोस मिक्स करण्याबाबत विचार करण्यात आला. मात्र, संशोधनातून असं समोर आलं, की कोरोना लसीचे दोन वेगवेगळे डोस रुग्णाला दिले गेल्यास याचे साईट इफेक्ट्स जाणवू शकतात. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, एका मेडिकल जर्नलमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की दोन वेगवेगळ्या लसी घेतल्यानं थकवा आणि डोकेदुखीसारख्या समस्या जाणवत आहेत. मात्र, ही लक्षणं खूप कमी कालावधीसाठी दिसतात आणि ती जास्त तीव्रही नसतात. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या (Oxford University) संशोधनकर्त्यांनीही यावर अभ्यास केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन वेगवेगळ्या लसी घेतल्यास काही काळासाठी दुष्परिणाम जाणवू शकतात. द लांसेट मेडिकल जर्नलच्या रिपोर्टनुसार, लोकांना आधी अॅस्ट्राजेनेकाची लस दिली गेली आणि दुसऱ्यांदा फाइजरची लस दिली गेली. दुसरी लस घेतल्यानंतर लोकांमध्ये साईड इफेक्ट्स पाहायला मिळाले, मात्र ते अधिक गंभीर नव्हते.