पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)
नवी दिल्ली 06 मे : देशभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजन (Oxygen), व्हेंटिलेटर बेड्स (Ventilator) आणि आवश्यक औषधांचा तुटवडा जाणवत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. या सर्व स्थितीच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी एक चांगली बातमी आहे. मे महिन्याच्या मध्यात किंवा अखेरच्या आठवड्यात कोरोनाची गंभीर स्थिती निवळेल, असा अंदाज प्रख्यात विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग (Virologist Gagandeep Kang) यांनी वर्तवला आहे. यावेळी त्यांनी लसीच्या प्रभावाबाबत चर्चा केली असून लॉकडाऊन (Lockdown) लागू करावं, असं मतही मांडलं आहे. इंडियन वूमन प्रेस कॉर्प्सची र्व्हच्युअल बैठक (Virtual Meeting) नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी मे महिन्याच्या मध्यात किंवा अखेरच्या आठवड्यात कोरोनाची गंभीर स्थिती निवळेल, अशी शक्यता डॉ.कांग यांनी व्यक्त केली. डॉ. कांग सध्या महामारी रोखण्यासाठी पंजाब आणि आंध्र प्रदेश सरकारचे सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. यावेळी बोलताना डॉ. कांग यांनी देशातील लसीकरणाचं (Vaccination) कौतुक केलं. ते म्हणाले, की सरकार देत असलेली लस कोरोनाविरुध्द खूप प्रभावी ठरत आहे. तसेच संसर्गापासूनही बचाव करत आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावं. सध्या देशात कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सीन (Covaccine) या लसी नागरिकांना दिल्या जात असून भविष्यात लसींची संख्या आणखी वाढेल. डॉ. कांग यांनी सांगितलं, की या लसी गंभीर आजार आणि त्यामुळे होणारा मृत्यू याविरोधात चांगल्या प्रभावी ठरत आहेत. जरी तुम्हाला संसर्ग झाला तरी त्याचा प्रभाव कमी करण्याचे काम लस करीत आहे. जरी टेस्टिंगची संख्या कमी केली तरी दररोजची कोरोनाबाधितांची संख्या 4.5 लाखांपर्यंत पोहोचू शकते. लॉकडाऊनबाबत डॉ. कांग म्हणाले, की या स्थितीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय मदत करु शकतो. जर आपल्याला 2 ते 3 आठवड्यांनी कोरोनाबाधितांच्या संख्येत घट पाहायची असेल तर लॉकडाऊन करणं आवश्यक आहे. यामुळे आपल्याकडे 3 आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्या नक्कीच कमी झालेली दिसेल. परंतु, प्रश्न हा आहे की आपण हा पर्याय निवडण्याच्या स्थितीत आहोत का? जर नागरिक सुरक्षित राहणार असतील, मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नसेल, तसेच सर्वांना पुरेसे अन्न आणि अन्य सुविधा मिळण्याची खात्री सरकार देत असेल, तर लॉकडाऊनच्या पर्यायचा विचार करण्यास हरकत नाही, असे डॉ. कांग यांनी स्पष्ट केले.