बागपत, 06 मे: देशाभोवती कोरोनाचा विळखा (Corona Infection) अधिकाधिक घट्ट होऊ लागला आहे. देशातील अनेक दिग्गजांचा घास या कोरोनाने घेतला आहे. गुरुवारी देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे राष्ट्रीय लोक दलाचे (Rashtriya Lok Dal) अध्यक्ष अजित सिंह (Chaudhary Ajit Singh) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अजित सिंह आणि त्यांची नात 22 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी फुप्फुसांमध्ये इन्फेक्शनमुळे अजित सिंह यांचं निधन झालं. दरम्यान त्यांच्या नातीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. अजित सिंह यांच्या जाण्याने राजकीय वर्तुळात दु:ख व्यक्त केलं जात आहे.
अजित सिंग यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या निधनाबद्दल अधिकृत माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. सोशल मीडियावर देखील अनेकांनी चौधरी अजित सिंह यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं जात आहे.
समाजवादी पार्टीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील अजित सिंह यांच्या जाण्याने शोक व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की, ‘राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह याचं निधन, अत्यंत दु:खद! तुमचं असं अचानक निघून जाणं शेतकऱ्यांचा संघर्ष आणि भारतीय राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण करून गेलं आहे. शोकाकुल कुटुंबीयांप्रति संवेदना! देव तुमच्या आत्म्यास शांती देवो!’