JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / 'आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायचं का?' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री

'आम्ही स्वतःला फासावर लटकवून घ्यायचं का?' लशीबाबतच्या प्रश्नावर भडकले केंद्रीय मंत्री

लशींच्या उपलब्धतेवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय रसायनमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा (D. V. Sadanand Gowda) यांनी चिडून उत्तर दिलं. ‘पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊ शकलं नाही, तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवायला हवं का,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बेंगळुरू 14 मे: कोरोना लसीकरण (Corona Vaccination) हा सध्या जगभरातला महत्त्वाचा विषय बनला आहे. भारतात लशींच्या तुटवड्यावरून रणकंदन सुरू असून केंद्राकडून लशींचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याची टीका अनेक राज्यांकडून होत आहे. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यातल्या आतापर्यंतच्या लसीकरणाचा वेग 50 टक्क्यांनी कमी झाला असल्याचंही सरकारच्याच आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. दरम्यान, लशींच्या उपलब्धतेवरून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय रसायनमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा (D. V. Sadanand Gowda) यांनी चिडून उत्तर दिलं. ‘पुरेशा प्रमाणात उत्पादन होऊ शकलं नाही, तर काय आम्ही स्वतःला फासावर लटकवायला हवं का,’ असा प्रतिसवाल त्यांनी विचारला आहे. सगळ्या नागरिकांचं लसीकरण (Vaccination) करणं ही केंद्र सरकारची जबाबदारी असल्याचं सुप्रीम कोर्टाने अलीकडेच सांगितलं. त्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारला असता सदानंद गौडा यांचा पारा चढला. ‘देशातल्या सगळ्या नागरिकांचं लसीकरण करायला हवं, ही कोर्टाने चांगल्या हेतूने केलेली टिप्पणी आहे. मी तुम्हाला विचारू इच्छितो, की कोर्टाने उद्या सांगितलं, की तुम्हाला अमुक इतके डोसेस द्यायला हवेत. मात्र, तेवढं उत्पादन होऊ शकलं नाही, तर काय आम्ही स्वतःला फाशी द्यायला हवी का?’ असं गौडा यांनी विचारलं. लशीच्या तुटवड्याच्या प्रश्नांवर उत्तर देताना गौडा यांनी सरकार करत असलेल्या नियोजनावर भर दिला. याबद्दलचे निर्णय कोणत्याही राजकीय लाभाच्या हेतूने किंवा अन्य कारणाने घेतले जात नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. ‘सरकार आपलं काम इमानदारीने आणि निष्ठेने करत आहे. त्यादरम्यान काही उणीवा समोर आल्या आहेत; मात्र व्यावहारिक रूपाने काही गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेरच्या आहेत, त्याचं व्यवस्थापन आम्ही कसं करू शकणार?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘लशींचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सरकार आपल्या बाजूने शक्य ते सर्व आणि सर्वोत्तम प्रयत्न करत आहे. ज्या काही त्रुटी आहेत, त्यावर एक-दोन दिवसांत उपाय निघून प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी सरकार कार्यरत आहे,’ असं गौडा यांनी स्पष्ट केलं. ‘व्यवस्था लवकरात लवकर सुधारली नाही, तर परिस्थिती आणखी बिकट होत जाईल,’ असं गौडा यांच्यासोबत उपस्थित असलेले भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी. टी. रवी यांनी सांगितलं. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. विनोदकुमार पॉल (Dr V. K. Paul) यांनी सांगितलं, की डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व नागरिकांचं लसीकरणकरण्याकरिता देशात लशींचा पुरेसा साठा असेल. ऑगस्ट ते डिसेंबर 2021 या कालावधीत भारताकडे 216 कोटी डोसेस असतील, असं पॉल यांनी 13 मे रोजी सांगितलं आहे. दरम्यान, 14 राज्यांना कोव्हॅक्सिन (Covaxin) लशींचा थेट पुरवठा केल्याचं हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने नुकतंच जाहीर केलं होतं. तसंच, कोविशिल्ड (Covishield) या लशीचं उत्पादन वाढवण्यासाठी जून-जुलै महिन्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो, असं सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला (Adar Poonawala)यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या