नवी दिल्ली 30 एप्रिल : देशाला कोरोनाच्या भयावह संसर्गातून बाहेर काढण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याचं अनेक तज्ज्ञ आणि सरकारही सांगत आहे. त्यामुळेच लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात (Vaccination Drive) एक मेपासून 18 ते 45 या वयोगटातल्या व्यक्तींचं लसीकरण करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये कोरोनाप्रतिबंधक लशींचा (Vaccine) पुरेसा साठा नाहीये किंवा त्याबद्दल अनिश्चितता आहे. म्हणूनच महाराष्ट्र, दिल्ली आणि अनेक राज्यांनी एक मेपासून 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे. 18 ते 45 वयोगटातल्या नागरिकांसाठी को-विन पोर्टलवर (Co-WIN) 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली. मात्र, महाराष्ट्रासह ज्या राज्यांनी लशी उपलब्ध नसल्याने लसीकरण सुरू करणार नसल्याचं सांगितलं, त्या राज्यातल्या नागरिकांना नोंदणी केल्यानंतर अपॉइंटमेंट शेड्यूल करता येत नाहीये. 28 एप्रिलला सायंकाळी नोंदणी (Registration) सुरू झाल्यावर सुरुवातीला आलेल्या काही तांत्रिक अडचणींनंतरही 2 कोटीहून अधिक जणांनी को-विन पोर्टलवर नोंदणी केली आहे. कोणकोणत्या राज्यांत एक मेपासून 18 ते 45 वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण सुरू होणार नाही, हे पाहू या. 1. मुंबईत (Mumbai) लशीचा साठा पुरेसा नसल्याने शुक्रवारपासून (30 एप्रिल) तीन दिवस लसीकरण बंद ठेवण्यात येणार आहे. पुरेसा साठा नसल्याने महाराष्ट्रातल्या (Maharashtra) 18 वर्षांवरच्या नागरिकांचं लसीकरण एक मेपासून सुरू होणार नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, 45 वर्षांवरच्या नागरिकांचं लसीकरण पूर्वीप्रमाणेच सुरू राहिल, असं मुंबई महापालिकेने पुन्हा स्पष्ट केलं. ‘नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये किंवा रांगा लावू नये. लशींचा साठा पुरेशा प्रमाणात नाही आणि तो सगळीकडे आवश्यकतेइतका उपलब्ध नाही. मात्र 45 वर्षांवरच्या सर्वांचं लसीकरण पूर्ण केलं जाणार आहे,’ असं मुंबई महापालिकेने सांगितलं आहे. 2.दिल्ली (Delhi) सरकारने सांगितलं, की लस उत्पादक कंपनीकडून नव्या पुरवठ्याची वाट पाहत आहोत.‘सध्या राज्यात लस नाही. कंपनीला तसं कळवण्यात आलं असून लशींचा साठा आल्यावर लसीकरणाबाबत जाहीर केलं जाईल,’ असं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं. 3.मध्य प्रदेशातही (Madhya Pradesh) एक मेपासून 18 वर्षांवरच्या नागरिकांचं लसीकरण होणार नसल्याच्या वृत्ताला मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दुजोरा दिला.‘कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींच्या उत्पादक कंपन्यांना आम्ही ऑर्डर दिली होती, मात्र एक मेपर्यंत लशींच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे लशींचा साठा आल्यानंतर लसीसकरणाचा पुढचा टप्पा सुरू केला जाईल,’ असं शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्ट केलं. 4.झारखंड (Jharkhand) राज्यातही एक मेपासून 18 ते 45 वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण होणार नाही. भारत बायोटेक आणि सिरम या दोन्ही कंपन्यांना झारखंडने 25-25 लाख लशींची ऑर्डर दिली आहे. मात्र सध्या पुरवठा करू शकत नसल्याचं दोन्ही कंपन्यांनी कळवलं आहे. केंद्र सरकारची ऑर्डर पूर्ण करण्यासच 15 ते 20 मेपर्यंतचा कालावधी लागेल, असं कंपन्यांनी सांगितल्याचं आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी सांगितलं. त्यामुळे लशींचा साठा आल्यानंतरच लसीकरण सुरू होणार आहे. 5.बिहारमध्ये (Bihar) आतापर्यंत 5.46 कोटी जणांना लस देऊन झाली आहे. मात्र लशींचा साठा पुरेसा नसल्याने एक मेपासून 18 ते 45 वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण सुरू होऊ शकणार नसल्याचं राज्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 6.गुजरातमध्येही (Gujarat) एक मेपासून 18 ते 45 वयोगटातल्या व्यक्तींचं लसीकरण सुरू होणार नाही. कारण तेवढा पुरेसा साठा नाही, असं मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सांगितलं. ‘सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्डचे दोन कोटी डोस आणि भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिनचे 50 लाख डोस गुजरातला लवकरच मिळणार आहेत. 15 दिवसांत लशींचा साठा आल्यानंतर लसीकरण सुरू होईल. तेव्हा सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं,’ असं रूपाणी यांनी सांगितलं. 7.तमिळनाडूने (Tamilnadu) दीड कोटी डोसची ऑर्डर दिली आहे; मात्र एक मेपासून पुढच्या टप्प्याचं लसीकरण सुरू होणार की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं. 8.राजस्थानातही (Rajasthan) लशींचा तुटवडा जाणवत आहे. लस उत्पादक कंपन्या 15 मेपूर्वी लशींचा पुरवठा करू शकणार नाहीत, असं त्यांनी सांगितल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी सांगितलं. सध्या आमच्याकडे लशीचा साठा नाही. 18 वर्षांवरच्या नागरिकांच्या लसीकरणासाठी आम्हाला सात कोटी डोसची गरज आहे. सिरम इन्स्टिट्यूटला आम्ही 3.75 कोटी डोस देण्यास सांगितलं आहे; मात्र त्यांना आधी केंद्र सरकारची ऑर्डर पूर्ण करायची असल्याने ते सध्या राज्याला लस देऊ शकत नाहीत, असं शर्मा यांनी सांगितलं.