मुंबई, 22 एप्रिल: सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी (CPM General Secretary Sitaram Yechury) यांचा मोठा मुलगा आशिष येचुरी यांचे गुरुवारी सकाळी कोव्हिडमुळे निधन झाले. गुरुग्राममधील एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्यावर होली फॅमिली रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. आशिष एक पत्रकार होते, ते दिल्लीतील एका प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी सीनिअर कॉपी एडिटर म्हणून काम करत होते. वयाच्या 34 व्या वर्षी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. मित्र परिवारात आणि कुटुंबीयांमध्ये त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. सीताराम येचुरी यांनी देखील याबाबत ट्वीट केलं आहे.
या प्रसंगी ट्वीट करत सीताराम येचुरी यांनी कोव्हिड वॉरियर्सचे आभार मानले आहेत. त्यांनी असे ट्वीट केले आहे की, ‘अतिशय दु:खात मी सांगू इच्छितो की आज सकाळी माझा मोठा मुलगा आशिष येचुरीला मी कोव्हिड-19 मुळे गमावले. ज्यांनी आम्हाला आशा दिली आणि ज्यांनी त्याचे उपचार केले - डॉक्टर, परिचारिका, फ्रंटलाइन आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार आणि असंख्य इतर जे आमच्या पाठीशी उभे होते त्यांच्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.’ अनेक नेत्यांनी सीताराम येचुरींच्या दु:खात सहभागी होत, आशिष यांना श्रद्धांजली वाहिली आहे.