मुंबई, 9 मार्च : कोरोनाचे बनावटी रिपोर्ट तयार करीत असल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईत थायरोकेअर टेक्नॉलॉजी कंपनीत विधी कार्यकारी अधिकारी पदावर बिरुदेव सरोदे काम करतात. त्यांनी त्यांच्या कंपनीत सर्विस प्रोव्हायडर क्लाइंटच्या पदावर काम करणारे अब्दुल साजिद खान यांना रमेमुंश खबरानी नावाच्या रुग्णाला त्याच्या रक्त आणि इतर रिपोर्टचा निकाल येण्यापूर्वी थायरोकेअर टेक्नॉलॉजी कंपनीच्या लेटर हेडवर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं लिहून दिलं होतं. मात्र रमेश खबरानी या रुग्णाचा खरा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात खोटा रिपोर्ट तयार करणे, जागतिक महासाथीच्या नियमांचं उल्लंघन, कंपनीच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी आरोपी अब्दुल साजिद खान याला अटक केली आहे. सोबतच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, पोलीस याचाही तपास करीत आहेत. हे ही वाचा- Corona Vaccine घेतल्यानंतर तीन नवे साइड इफेक्ट्स आले समोर; चिंतेची बाब आहे का? याआधीच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना महासाथ तेजीने पसरत आहे. आता कोरोनाचे खोटे रिपोर्ट समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांसाठी यावर नियंत्रण आणण्याचं मोठं आवाहन असणार आहे. दरम्यान कोरोनाची लस घेतल्यानंतर 8 मार्च 2021 रोजी एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई महापालिकेने तज्ज्ञांची एक समिती नेमली असून या व्यक्तीचा मृत्यू कोविशिल्ड ही लस घेतल्याने झाला का? किंवा त्यामागे आणखी कोणती कारणं आहेत, याचा तपास केला जाईल. काल 68 वर्षीय व्यक्तीने एका खाजगी रुग्णालयात ही लस घेतली होती. त्यानंतर ते बेशुद्ध झाले आणि नंतर काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला होता.