JOIN US
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरियंटचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात, लसीच्या प्रभावाबद्दल काय म्हणाले संशोधक?

कोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरियंटचं सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात, लसीच्या प्रभावाबद्दल काय म्हणाले संशोधक?

कोरोनाच्या डबल म्युटंट व्हेरियंटचा (Double Mutant Variant) सर्वाधिक प्रसार महाराष्ट्रातच असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) या दोन्हीही लशी त्या व्हेरियंटवर प्रभावी असल्याचंही संशोधनात आढळलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 24 एप्रिल : भारतात नव्याने आढळलेला आणि जास्त संसर्ग क्षमता असलेला कोरोना विषाणूचा डबल म्युटंट व्हेरियंट (Double Mutant Variant) अर्थात B.1.617 याचा सर्वाधिक प्रसार महाराष्ट्रातच असल्याचं स्पष्ट झालं आहे. अर्थात, संपूर्ण राज्यात तो पसरलेला नसून, काही निवडक जिल्हे आणि शहरांमध्येच तो आढळला आहे, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) या दोन्हीही लशी त्या व्हेरियंटवर प्रभावी असल्याचंही संशोधनात आढळलं आहे. ‘नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल’चे संचालक डॉ. सुजित कुमार सिंग यांनी ‘जीनोम सिक्वेन्सिंग ऑफ सार्स-सीओव्ही-19’ या विषयावरच्या वेबिनारमध्ये ही माहिती दिली. कोरोना विषाणूच्या जनुकीय संशोधनासाठी इंडियन सार्स सीओव्ही टू जिनॉमिक कन्सॉर्शियमची (Indian SARS-CoV-2 Genomic Consortium - INSACOG) स्थापना करण्यात आली आहे. ‘इन्साकोग’च्या 10 प्रयोगशाळांमध्ये कोरोना विषाणूच्या 15 हजार 133 नमुन्यांचं जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं. त्यापैकी 1196 नमुने ब्रिटनमधल्या व्हेरियंटचे, 29 नमुने दक्षिण आफ्रिकेतल्या व्हेरियंटचे, तर 728 नमुने डबल म्युटेशन किंवा इंडियन म्युटेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या B.1.617 या व्हेरियंटचे असल्याचं आढळून आलं. भारतीय व्हेरियंटच्या 728 नमुन्यांपैकी 427 महाराष्ट्रातले, 124 पश्चिम बंगालमधले, 75 दिल्लीतले, तर 53 मध्य प्रदेशातले असल्याचं स्पष्ट झालं. ब्रिटन व्हेरियंटच्या 1196 नमुन्यांपैकी 543 पंजाबातले, 124 दिल्लीतले, तर 29 महाराष्ट्रातले नमुने असल्याचं आढळलं, अशी माहिती डॉ. सुजित कुमार सिंग यांनी दिली. भारतीय डबल म्युटंट व्हेरियंटपासून कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लशी संरक्षण देऊ शकतात, असं हैदराबादच्या ‘सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’च्या (CCMB) संशोधनात आढळल्याची माहिती विषाणूतज्ज्ञ डॉ. शहीद जमील यांनी दिली. 11 टक्के नमुन्यांचं जीनोम सिक्वेन्सिंग केलं जातं. ब्रिटनमधला व्हेरियंट (UK Variant) पंजाबमध्ये जास्त प्रमाणात दिसत असला, तरी दिल्लीमध्ये त्याची क्षमता जास्त वाढत असल्याचं दिसतं. महाराष्ट्रात विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये म्युटेशन्स (Mutations) आढळण्याचं प्रमाण जास्त आहे, असं निरीक्षण डॉ. सिंग यांनी नोंदवलं. तरीही रुग्णवाढीसाठी म्युटेशन्स कारणीभूत आहे, असं म्हणता येत नाही, असं त्यांनी सांगितलं. संसर्ग झालेल्या व्यक्तींचं प्रमाण, प्रत्येकाची प्रतिकारशक्ती, कोविडच्या अनुषंगाने वागण्याची काळजी घेणाऱ्या व्यक्ती, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अशा अनेक कारणांवर संसर्ग वाढण्याचं प्रमाण अवलंबून आहे, असं ते म्हणाले. ‘काही म्युटेशन्स प्रतिकार यंत्रणेला दाद देत नसली, (Immune Escape) तरी त्यांच्यापासून काळजी घेण्याचा मंत्र नेहमीचाच आहे. मास्क योग्य पद्धतीने घालणं, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन आवश्यक आहे,’ असंही डॉ. जमील यांनी सांगितलं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (NIV) या संस्थेच्या संचालिका डॉ. प्रिया अब्राहम यांनी आरटीपीसीआर (RT-PCR Test) चाचणीविषयीच्या शंका दूर केल्या. काही वेळा सॅम्पल घेताना झालेल्या चुकीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे रुग्ण पॉझिटिव्ह असूनही टेस्ट निगेटिव्ह येण्याचे काही प्रकार घडले; मात्र आजही कोविडचं योग्य निदान करण्याची आरटीपीसीआर हीच प्रभावी चाचणी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या