नवी दिल्ली 10 मार्च : जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीचा (Coronavirus) प्रसार थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. आता भारत आणि अमेरिकेसह इतरही देशांमध्ये लसीकरणालाही (Corona Vaccine) सुरुवात झाली आहे. मात्र, लसीकरणानंतर अनेकांवर याचे साइड इफेक्ट्स (Corona Vaccine Side Effect) होत असल्याचंही समोर आलं आहे. यात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या अधिक आहे. अमेरिकेतही हीच स्थिती आहे. अमेरिकेच्या पेन्सिलवेनियामधील 44 वर्षाच्या मेडिकल टेक्निशियन शेली केंडेफी यांनीही नुकतंच कोरोनाची दुसरी लस घेतली होती. मात्र, यानंतर त्यांची तब्येत अचानक खराब झाली. शेली यांनी मॉडर्नाची कोरोना लस दिली गेली होती. लस दिली गेली तेव्हा सगळं ठीक होतं. मात्र, नंतर त्यांच्या त्वेचवर याचे परिणाम दिसू लागले आणि अंगदुखी सुरू झाली. त्यांना ताप आल्यासारखं जाणवू लागलं आणि भरपूर घामही येऊ लागला. यामुळे शेली प्रचंड घाबरल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जात त्यांनी त्यांच्यासोबत लस घेतलेल्या इतर सहकाऱ्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेतली. मात्र, याबद्दलची माहिती मिळताच ती आश्चर्यचकीत झाली. लस घेतलेल्या सातपैकी 6 महिलांमध्ये साइड इफेक्ट जाणवत होते. तर, आठ पुरुषांपैकी केवळ चौघांमध्येच याचे साइड इफेक्ट जाणवत होते. मागील महिन्यात सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिवेंशनच्या शोधकर्त्यांनी लसीकरण करण्यात आलेल्या 1.37 कोटी अमेरिकी लोकांचा अभ्यास केला. यात असं समोर आलं, की लसीकरणानंतर 79.1 महिलांमध्ये साइड इफेक्ट्स दिसून येत आहेत. विशेष बाब म्हणजे लसीकरणात केवळ 61.2 टक्के हिस्साच महिलांना दिला गेला होता. अभ्यासकांच्या मते, अतिसंवेदनशीलतेमुळे महिलांमध्ये याचे अधिक साइड इफेक्ट आढळून आले. त्यांनी असंही सांगितलं, की मॉडर्ना लस घेतल्यानंतर सर्व 19 महिलांमध्ये याचे साइड इफेक्ट दिसले. तर, फायजन लसीमध्ये 47 मधील 44 महिलांवर याचे साइड इफेक्ट झाले. शरीरामध्ये हे बदल होण्याचा अर्थ लसीचा परिणाम होत आहे, असा असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.