मुंबई ०४ मार्च : देशातील दोन राज्यांमध्ये कोरोना (Corona Virus) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. याठिकाणची स्थिती चिंताजनक असून महाराष्ट्रातील बुधवारचा कोरोना रुग्णांचा आकडा (Corona Cases in Maharashtra) चिंतेत भर घालणारा आहे. बुधवारी महाराष्ट्रात ९८५५ तर केरळमध्ये २७०० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या पाहिल्यास ६० ते ७० टक्के रुग्ण केवळ या दोन राज्यांमधील आहेत. मात्र, राज्यातील स्थित आणखीच भयानक आहे (Maharashtra Coronavirus Latest Update). याच कारणामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. मुंबईमधील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा एकदा झपाट्यानं वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी बुधवारी मास्क न वापरणाऱ्या आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कमीत कमी १ हजार लोकांकडून दंज वसूल करण्यास सांगितलं आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ३,६०,५०० लोक सध्या होम क्वारंटाईन आहेत. तर, मुंबई महापालिकेनं निर्देश दिले आहेत, की ब्राझीलमधून परतणाऱ्या सर्व प्रवाशांनी ७ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहाणं गरजेचं आहे. रिपोर्ट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आला तरीही प्रवाशांना या नियमाचं पालन करावं लागणार आहे. तर, दुसरीकडे नियमांचं पालन न केल्यास राज्यात पुन्हा लॉकडाऊन केलं जाईल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिला आहे. २२ राज्यांमधील १४० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख वाढताना दिसत आहे. सर्वाधिक महाराष्ट्रातील ३६ जिल्हे प्रभावित आहेत. याशिवाय केरळमधील ९, तमिळनाडूतील ७, पंजाब आणि गुजरातमधील ६-६ जिल्ह्यांचा समावेश आहे. केंद्राच्या आरोग्य मंत्रालयानं कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे.