कोरोना रुग्णांसाठी मेडिकल ऑक्सिजन सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. हा मेडिकल ऑक्सिजन नेमका काय आहे? कसा बनतो? आणि रुग्णालयांपर्यंत कसा पोहोचतो?
संपूर्ण देशभरात कोरोनाच्या वाढत्या (COVID-19) प्रादुर्भावामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यात स्थिती गंभीर असून रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजनची कमी आहे. कोरोना रुग्णांसाठी मेडिकल ऑक्सिजन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
ऑक्सिजन (oxygen) हवा आणि पाणी दोन्हीमध्ये असतो. हवेत 21 टक्के ऑक्सिजन असतो, तर 78 टक्के नायट्रोजन असतं. ऑक्सिजन प्लांटमध्ये हवेतून ऑक्सिजन वेगळा केला जातो.
उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्ये दीनदयाल येथील इंडियन एयर गॅसेजचे टेक्निकल मॅनेजर राकेश राय यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितलं की, ऑक्सिजन बनवताना एयर सेपरेशन तंत्रांचा वापर केला जातो. म्हणजेच हवेला कंप्रेस केलं जातं. त्यानंतर फिल्टर केलं जातं, जेणेकरुन त्यातील अशुद्धता निघून जाईल. त्यानंतर ही फिल्टर केलेली हवा थंड केली जाते. त्यासाठी अनेक टप्पे पार केले जातात.
त्यानंतर हवेला डिस्टिल केलं जातं, जेणेकरुन ऑक्सिजन इतर गॅसेसपासून वेगळा केला जाईल. याप्रक्रियेत ऑक्सिजन लिक्विड बनतं आणि त्याच स्थितीत ते एकत्र केलं जातं.
ऑक्सिजन कंप्रेस करुन गॅसमध्ये कन्वर्ट केला जातो आणि रिफिलिंग स्टेशनला सप्लाय करुन सिलेंडरमध्ये भरला जातो. ऑक्सिजन गॅस लहान-मोठ्या कॅप्सुलनामक टँकरमध्ये भरुन रुग्णालयांमध्ये पोहचवला जातो. एक ऑक्सिजन सिलेंडर भरण्यासाठी 3 मिनिटांचा वेळ लागतो. एकावेळी पॅनल बनवून 20 हून अधिक सिलेंडर भरले जातात.