नवी दिल्ली 24 मे : देशातील कोरोना रुग्णसंख्या (Corona Cases in India) आता काही प्रमाणात आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, रुग्णांचा मृत्यूदर (Covid Death Rate in India) कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. देशभरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा तीन लाखाहून अधिक झाला आहे. वर्ल्डोमीटरनुसार, रविवारी रात्री 10 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात 4,056 रुग्णांनी जीव गमावल्यानंतर कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा वाढून 3,03,355 वर पोहोचला आहे. यानंतर अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसरा असा देशा ठरला आहे, जिथे कोरोनामुळे तीन लाखाहून अधिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, की रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात 21,23,782 जणांचा कोरोना चाचणी केली गेली. यादरम्यान कोरोनाची नवी रुग्णसंख्या 35 दिवसांत पहिल्यांदाच अडीच लाखापेक्षा कमी नोंदवली गेली. देशात सलग पाचव्या दिवशी एकाच दिवसात 20 लाखाहून अधिकांची कोरोना चाचणी केली गेली. 2.4 लाख नवे रुग्ण समोर आल्यानंतर एकूण बाधितांची संख्या वाढून 2,65,30,132 वर पोहोचली. तर, रविवारी 3,741 कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा 2,99,266 वर पोहोचला. देशात 22 मेपर्यंत एकूण 32,86,07,937 जणांची कोरोना चाचणी केली गेली आहे. यातील 21,23,782 नमुन्यांची चाचणी शनिवारी केली गेली आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून 28,05,399 झाली आहे.. ही संख्या एकूण रुग्णसंख्येच्या 10.57 टक्के आहे. तर, कोरोनातून बरं होणाऱ्यांचा दर 88.30 टक्के आहे. 24 तासात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1,18,001 नं घट झाली आहे. सात राज्यं असे आहेत जिथे देशातील 66.88 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण आहेत महामारीतून बरं होणाऱ्यांची संख्या वाढून 2,34,25,467 वर पोहोचली आहे. तर, मृत्यूदर 1.13 टक्के आहे. कोरोना संसर्गाचा दरही घटून 11.34 टक्क्यांवर आला आहे.