नवी दिल्ली 13 एप्रिल : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) Sputnik V या लसीच्या आपात्कालीन वापरास मंजूरी दिली आहे. यानंतर आता भारताला तिसरी लस मिळाली (India gets 3rd COVID-19 vaccine) आहे. रशियाच्या ‘Sputnik V’ लशीला आपत्कालीन वापराची परवानगी देण्याबाबतच्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या अर्जावर केंद्रीय औषध नियामक संस्थेच्या तज्ज्ञ समितीने सोमवारी चर्चा केली. आतापर्यंत 59 देशांमध्ये ही रशियन लस वापरण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. भारतात नोंदणी झालेल्या आणि वापरास परवानगी मिळालेल्या लसींपैकी ही आता तिसरी लस ठरली आहे. Sputnik V लस देण्यात एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला सुरुवात केली जाईल, असं RDIF नं सांगितलं. देशात या लसीचे उत्पादन सुरू होण्याआधी सुरुवातीला ही लस आयात केली जाईल. कोरोनाचा नवा स्ट्रेन वाढवतोय चिंता; RT-PCR चाचणीही ठरतीये अयशस्वी भारतात सध्या सिरम इन्सटिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींचा वापर केला जात आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अशात Sputnik V लसीच्या वापरास मंजूरी मिळाल्यानं हा उद्देश साध्य करणं काही प्रमाणात सोपं होणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा जाणवत असतानाच आता ही दिलासादायक बातमी समोर आली आहे. “Sputnik V च्या वापराला अधिकृत मान्यता देण्याच्या भारताच्या नियामक संस्थांच्या निर्णयाचे आम्ही कौतुक करतो. लसीला मान्यता देणं हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण रशिया आणि भारत Sputnik Vच्या क्लिनिकल चाचण्यांना आणि त्याच्या स्थानिक उत्पादनासाठी व्यापक सहकार्य करत आहेत,” असं रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील म्हणाले.