नवी दिल्ली, 4 जानेवारी : कोरोना व्हायरस (Coronavirus) रोखण्यासाठी सध्या भारतासह जगभर प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपनीनं तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ (Covaccine) या स्वदेशी लशीच्या आपत्कालीन वापरास केंद्रीय औषध नियंत्रक विभागानं (DCGI) मान्यता दिल्यानं नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस खासदार शशी थरुर आणि जयराम रमेश यांनी या परवानगीबाबत यापूर्वीच सरकारला प्रश्न विचारले होते. त्यापाठोपाठ आता देशातील प्रमुख शास्त्रज्ञांनी या लशीची परिणामकारता तपासण्यासाठी वापरण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील डेटाबाबत आक्षेप नोंदवला आहे. काय आहेत शास्त्रज्ञांचे आक्षेप? ‘इंडियन एक्स्प्रेस’ नं दिलेल्या वृत्तानुसार काही स्वतंत्र शास्त्रज्ञांनी तिसऱ्या टप्प्यातील डेटावर शंका उपस्थित केली आहे. भारत बायोटेकनं घेतलेल्या चाचण्यांमधील पहिल्या दोन टप्पे हे समाधानकारक आहेत. मात्र नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातील परिणामकारकता डेटा (Efficiency Data) अजून समोर आलेला नाही. व्हायरसाचा हल्ला रोखण्यासाठी हे औषध किती प्रभावशाली आहे, याची माहिती या डेटावरुन समजते. “Covid 19 वरील औषधांच्या मान्यतेसाठी DCGI नं सप्टेंबर महिन्यामध्ये गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार त्यांना सुरक्षितता आणि परिणामकारकता डेटा हा दोन महिन्यांचा हवा आहे, हे स्पष्ट होते.’’ याची आठवण लस संशोधक आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक डॉ. गगनदीप कांग यांनी करुन दिली. या लशीच्या बाबत अजून पूर्णपणे नोंदणी देखील झालेली नाही. तेंव्हा DCGI नं मागितलेला परिणामकारकता डेटा कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला. “ही भारतीय लस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील जाणार आहे, त्यामुळे विश्वासर्हतेच्या पातळीवरील सर्व निकषांची काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. तसं न झाल्यास कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसू शकतो,’’ असं मत अशोका विद्यापीठातील शास्त्रज्ञ शाहिद जमील यांनी व्यक्त केलं आहे. हे वाचा- वाढत्या वजनाला रोखण्यासाठी जिरे ठरतील प्रभावी, जाणून घ्या 5 कारणं ‘सीरम इन्स्टिट्यूट 5 कोटी डोस तयार करणार आहे. भारत बायोटेकची लस तातडीनं दाखल होणार नाही. त्यावेळी तिसऱ्या टप्प्यातील प्राथमिक डेटाची प्रतीक्षा करणे आणि त्याचा अहवाल आल्यावर लशीला मान्यता देणे हा योग्य मार्ग आहे,’’ असं जमील यांनी स्पष्ट केले. सरकारचं स्पष्टीकरण काय? “कोव्हिड लशीच्या मागणीमध्ये अचानक वाढ होण्याची शक्यता आहे त्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यास ऑक्सफर्ड विद्यापीठात तयार झालेली लस असमर्थ ठरल्यास पर्याय म्हणून या लशीचा वापर करण्यास परवागी देण्यात आली आहे,’’ असं स्पष्टीकरण दिल्लीतल्या AIIMS चे संचालक आणि केंद्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदिप गुलेरिया यांनी दिलं आहे.