चेन्नई 20 मे : कोरोना विषाणूच्या (Coronavirus In India) कहरामुळे सध्या संपूर्ण देश चिंतेत आहे. अनेक राज्यांमध्ये अंशतः तर काही राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या महामारीपासून वाचण्यासाठी नियमांचं पालन आणि लसीकरण हे दोन महत्त्वाचे पर्याय मानले जात आहेत. एकीकडे शास्त्रज्ज्ञ विज्ञानाच्या मदतीनं महामारीला रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे काही लोक श्रद्धेचा मार्ग अवलंबत कोरोनाला पळवून लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील काही दिवसांपासून देशाच्या वेगवेगळ्या भागांतून कोरोना मातेच्या पुजेबाबतच्या बातम्या समोर येत आहेत. अशात आता तमिळनाडूच्या कोयंबतूरमधूनही (Coimbatore News) अशीच बातमी समोर आली आहे. येथील इरुगुरमधील कमाचीपुरी आदिनाम मंदिरानं कोरोना देवीची मूर्ती बनवण्याचा आणि त्याची पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, यामुळे लोक कोरोना संसर्गापासून वाचतील. आदिनाम मंदिरातील व्यवस्थापकांपैकी एक सिवालिनेजेश्वर म्हणाले की, पूर्वी कोलेरा आणि प्लेग सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी देवीची पूजा केली गेली होती. लोकांना आजारांपासून वाचवण्याची ही परंपरा आहे. यापूर्वी प्लेगसह इतर काही इतर देवी-देवतांची मूर्ती तयार केली गेली होती. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येनं रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात ग्रेनाइटनं बनलेली कोरोना देवीची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतकंच नाही तर इथे कोरोनासाठी विशेष पूजा आणि प्रार्थनाही केली जाईल. 48 दिवसांच्या या महायज्ञांदरम्यान सामान्य लोक यात सहभागी होऊ शकणार नाहीत. महायज्ञ पूर्ण झाल्यानंतरच लोक कोरोना देवीचं दर्शन घेऊ शकतील. तमिळनाडूच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, 34,875 नवे कोरोना रुग्ण समोर आल्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून 16,99,225 झाली आहे. तर, 365 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यातील एकूण मृतांची संख्या 18,734 वर पोहोचली आहे. मेडिकल बुलेटीननुसार, बुधवारी 23,863 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 14,26,915 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 2,53,576 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.