मुंबई, 29 मे : कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त आणि सोप्या पद्धतीने कोरोना टेस्ट (Corona test) कशी करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच नागरिकांनाच घरच्या घरी करता कोरोना टेस्ट करता येईल असं कोरोना टेस्ट किट (Corona test kit) उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तर आता नागरिकांनाच सोयीस्कर अशी आणखी एका कोरोना टेस्टलाही मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये फक्त गुळण्या करूनच कोरोना टेस्ट (Saline Gargle) करणं शक्य आहे. कोरोना निदानासाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) टेस्ट केली जाते. पण यासाठी स्वॅब नमुने घेतले जातात. जे नाकात किंवा घशात कॉटन स्वॅब (Swab test) टाकून घेतले जातात. पण आता आरटी-पीसीआर टेस्टसाठी या स्वॅबची गरज नाही. तर फक्त गुळण्या करूनच नमुने देता येतील. नागूपरच्या नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (NEERI) शास्त्रज्ञांनी काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च (CSIR) अंतर्गत आरटी-पीसीआर टेस्टचा हा नवा मार्ग शोधला आहे. त्यांनी सलाइन गार्गल टेस्ट तयार केली आहे. गुळण्यांमार्फत कशी होणार कोरोना टेस्ट सलायन गार्गलमध्ये एक ट्युब असेल. व्यक्तीला सलाइन आपल्या तोंडात ठेवून 15 सेकंद गुळण्या करायच्या आहेत. त्यानंतर गुळण्या केलेलं तोंडातील पाणी या ट्युबमध्ये थुकायचं आहे. गुळण्या केलेले हे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवायचे आहेत. लॅबमध्ये निरीने तयार केलेलया विशेष सोल्युशनमध्ये रूम टेम्प्रेचरमध्ये हे सॅम्पल ठेवलं जाईल. सोल्युशन गरम झाल्यावर RNA टेम्प्लेट तयार होईल. हे सोल्युशन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिअॅक्शन म्हणजेच आरटी-पीसीआर साठी जाईल. हे वाचा - UK मध्ये तिसऱ्या लाटेचा धोका, भारतावर काय होणार परिणाम? इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) या टेस्टला परवानगी दिली आहे. यामार्फत कोणतीही व्यक्ती फक्त तीन तासांत कोविड टेस्ट करू शकते. कोरोना टेस्टची ही पद्धत गेमसेंजर ठरेल, असा विश्वास केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी व्यक्त केला.