मुंबई, 28 मार्च : राज्यात कोरोनाना (Coronavirus) हाहाकार पाहायला मिळत आहे. आज तर राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या पाहायला मिळाली आहे. आज राज्यात 40,414 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही रुग्णसंख्या आतापर्यंतची सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय राज्यात 108 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यातील 17,847 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 23,32,453 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्याशिवाय राज्याचा रिकव्हरी रेट 85.95 पर्यंत पोहोचला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 6933 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून नाशिक जिल्ह्यात 6773 रुग्ण सापडले आहेत. इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्येचा आलेख वाढत असल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा- ‘इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार’; या देशात एका दिवसात मृत्यूचा रेकॉर्ड राज्यातील कोविड रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे (Lockdown in Maharashtra) अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या अत्यंत वेगाने वाढत असल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊन संदर्भात आज आयोजित महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली.