पाटणा, 13 जून : कोरोनाच्या (Coronavirus) संकटामध्ये नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या आणि त्यानंतरच्या दुसऱ्या लाटेनं (Corona Second Wave) अनेकांचे जीव घेतले. पण यानंतर आणखी एक संकट समोर आलं ते म्हणजे ब्लॅक फंगसचं (Black Fungus) . ब्लॅक फंगसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळले आणि त्यात मृतांचं प्रमाणही अधिक असल्याचं पाहायला मिळालं. आता बिहारच्या पाटणामधून ब्लॅक फंगसचं एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. (वाचा- कोरोना टेस्ट आली अंगाशी! सरपंचाच्या नाकातच तुटली स्वॅब स्टिक; पाहा पुढे काय घडलं ) पाटणा येथील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये ब्लॅक फंगसची लागण झालेल्या एका रुग्णावर अत्यंत जटील अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. हे ऑपरेशन यशस्वी ठरलं असून धक्कादायक बाब म्हणजे क्रिकेटच्या चेंडू एवढ्या आकाराचं ब्लॅक फंगस या व्यक्तीच्या मेंदूमधून काढण्यात आलं आहे. त्यामुळं डॉक्टरही ही अत्यंत कठीण अशी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानं आनंद व्यक्त करत आहेत. (वाचा- लसीकरणात देशभरातल्या खासगी रुग्णालयांचा निष्काळजीपणा, वाचून बसेल धक्का ) पाटण्याच्या 60 वर्षिय अनिल कुमार यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला होता. काही चाचण्यांनंतर त्यांनी इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आलं. तिथं तपासणीमध्ये त्यांना ब्लॅक फंगसची लागण झाल्याचं समोर आलं. फंगस त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचला होता, पण सुदैवानं डोळ्यांना काहीही झालेलं नव्हतं. त्यामुळं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मेंदू आणि डोक्याच्या भागातून ब्लॅक फंगस काढण्यासाठी करण्यात आलेल्या या शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरांना तब्बल तीन तास लागले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि अनिल कुमार यांचे डोळेही वाचले कारण ब्लॅक फंगस त्यांच्या डोळ्यापर्यंत पोहोचलंच नव्हतं. मात्र डॉक्टरांनी मेंदूतून काढलेलं ब्लॅक फंग हे जवळपास चेंडूच्या आकाराचं होतं. अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच केल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.