- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत
राज्याच्या राजकारणात एक स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून ओळखले जाणारे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्रातील घराघरात यापूर्वी वसंतदादा पाटील यांना ‘दादा’ म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर ‘आबा’ या पहिल्या नावाने ओळखले जाणारे आर.आर. हे एकमेव व्यक्तिमत्त्व होते. आज संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या सफाई अभियानाची चर्चा होतेय. घराघरात शौचालय असावे यासाठी ग्रामविकासमंत्री असताना आर.आर. पाटील यांनी घेतलेला पुढाकार आजही गावखेड्यातील लोकांना ठाऊक आहे. ग्रामीण भागातील जलपुरवठा योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जाव्यात यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय लक्षावधी लोकांच्या लक्षात आहेत. परंतु त्याहीपेक्षा आबा लोकांच्या लक्षात राहिले काही वादग्रस्त निर्णयांमुळे. मुंबईतील डान्सबार बंदीसंदर्भात त्यांनी घेतलेली कठोरभूमिका नेहमीच चर्चेत राहिली. मध्यरात्रीची मुंबई शांत आणि सुरक्षित राहावी यासाठी आबांनी डान्सबार बंदीची अंमलबजावणी केली होती. काळाचा दुदैर्वी खेळ कसा असतो पाहा ना. मुंबईतील नाईट लाईफची काळजी घेणारा हा लोकोत्तर नेता जेव्हा अखेरच्या घटका मोजत होता त्यावेळी शिवसेनेचं युवा नेतृत्व आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील नाईटलाईफ पुन्हा ‘जिवंत’ करण्याची चर्चा करत होते.
सांगली जिल्ह्यातील तासगावजवळच्या अंजनी या छोट्या खेड्यात आर.आर. पाटील यांचा जन्म झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर आईच्या साथीने आर.आर. आबा यांनी अगदी लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी घेतली. अगदी सोळा-सतराव्या वर्षी अंगावर पडतील ती कामे करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच भाषणाची आवड असणार्या आबांनी शालेय आणि महाविद्यालयीन काळातील सर्वच वक्तृत्व स्पर्धांवर विजयी मोहोर उमटवली होती. वक्तृत्व स्पर्धेत मिळालेली बक्षिसाची रक्कम बर्याचदा परीक्षा फी भरण्यासाठी त्यांना उपयोगी पडत असे. आबांचा हा भाषणाचा वारसा त्यांची कन्या स्मिता हिने बर्यापैकी जपलेला दिसतो. महाविद्यालयात असतानाच आबांनी आपल्या नेतृत्वगुणाची चमक लोकांना दाखवली होती. कायद्याचं शिक्षण पूर्ण करताना त्यांनी राजकारणाची वाट धरली. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येताना त्यांनी दाखवलेली तडफ सांगली जिल्ह्यातील लोकनेते वसंतदादा पाटील यांच्या नजरेस पडली. ज्या तरुणासाठी शेकडो शिकलेली मुले सायकलवर प्रचार करतात आणि काहीही खर्च न करता निवडणूकही जिंकतात हे वसंतदादांनी अचूकपणे हेरले आणि आर.आर. आबांचा खर्या अर्थाने राजकीय उत्कर्ष सुरू झाला. त्या काळात ज्यांचा सांगलीच्या राजकारणात दबदबा होता अशा दिनकर आबा पाटील या प्रस्थापित नेतृत्वाचा पराभव करून आबा आमदार झाले. आणि सांगलीची मुलुखमैदान तोफ मुंबईच्या विधिमंडळात धडाडू लागली.
विधानसभेतील आबांचे कार्यकर्तृत्व हा खरे तर अभ्यासाचा विषय आहे. राज्यातील प्रत्येक प्रश्न समजून घेऊन त्यावर सखोलपणे आणि संयमाने बोलणे या गुणांमुळे आबा अल्पावधीत लोकप्रिय झाले. लक्षवेधी सूचना मांडण्यासाठी जी समयसूचकता लागते ती आबांकडे निश्चितच होती. त्यांचा स्वीय सहाय्यक बाळासाहेब गुरव आणि स्व.सुभाष अण्णा कूल यांचा स्वीय सहाय्यक भगवान या दोघांच्या प्रयत्नाने सगळ्या महत्त्वाच्या चर्चा आबा आणि सुभाष अण्णा यांच्या नावाने लागत. विशेषत: 1995 नंतर शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आल्यावर आबांच्या भाषणांना आवेश आणि उपरोधाची धार चढलेली दिसायची. आबांच्या भाषणांना अवघे सभागृह कधी मंत्रमुग्ध व्हायचे तर कधी त्यांच्या स्फोटक वाक्यांनी वातावरण तप्त होत असे. परंतु ज्यावेळी हलक्या-फुलक्या विषयांवर ते बोलायला उभे राहायचे तेव्हा अवघे सभागृह हास्यकल्लोळात बुडालेले असायचे. मंत्री झाल्यानंतर सुद्धा आबांमधील आक्रमकपणा कधीच कमी झाला नव्हता. सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर ते आपण मंत्री आहोत हे विसरून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बिनधास्तपणे बोलायचे. त्यांचा हा मोकळेपणा त्यांना अनेकदा तापदायकही ठरायचा. पण आबा आपली सामाजिक बांधिलकी सोडायला तयार नसत. शेती-शेतकरी आणि ग्रामीण जीवन हा आबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आपल्या अवतीभोवतीच्या समाजातील कोणत्याही निरपराध व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठी ते सतत धडपडायचे.
नक्षलग्रस्त गडचिरोलीचे पालकमंत्रिपद स्वीकारून आबांनी समाजातील तळागळातील माणसांसोबत आपली बांधिलकी स्पष्ट केली होती. त्यांचे अवघे आयुष्य म्हणजे संकटांचा संघर्षमय प्रवासच होता. पण तरीही त्यांच्या वर्तनात कधीच कटुता दिसत नसे. आपल्याला मिळालेले पद हे लोकसेवेसाठी आहे आणि अवघे आयुष्य लोकांसाठीच असावे यावर ते ठाम होते. त्यासाठी त्यांनी कधीच कुटुंबाची पर्वा केली नाही. आजच्या जमान्यात जेव्हा बहुतांश राजकारणी आपल्या पुढील पिढ्यांच्या उदरनिर्वाहाची सोय लावण्यात मग्न असतात त्याच काळात आर.आर. आबा आपलं सर्वस्व समाजचरणी वाहण्यासाठी धडपडत होते. एकदा मध्यरात्री 1 वाजता त्यांचा मोबाईल वाजला…पलीकडून कुणीतरी आपली कैफियत ऐकवत होता…मी आबांना विचारलं, ‘कोण आहे?’ ते उद्गारले, “सांगलीतून फोन होता, एका शेतकर्याच्या पिकात जनावरं घुसली होती. मला फोन करून मी काही त्याचे नुकसान भरून देणार नाही. पण माझ्याशी बोलण्याने त्याचे दु:ख हलके झाले असावे म्हणून मी बोललो. आज मी जो काही आहे, ते सारे या सर्वसामान्य माणसांच्या प्रेमामुळे. माझ्यासारखा गरीब घरातील कार्यकर्ता या महाराष्ट्रातील लोकांच्या प्रेमामुळे उपमुख्यमंत्री झाला. माझ्या कातडीचे जोडे केले तरी मराठी जनतेचे हे उपकार मी विसरू शकणार नाही.” आजच्या पंचतारांकित राजकीय दुनियेत अशी सामाजिक बांधिलकी जपणारा नेता पुन्हा होणे नाही.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++