महेश म्हात्रे,कार्यकारी संपादक, अायबीेएन लोकमत
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानु | वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ||
आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी ज्या मेघाला पाहून कवी कालीदासाला " मेघदूत " हे काव्य स्फुरले व वैष्विक पातळीवर ते पुढे अजरामर झाले त्या महाकवी कालीदासाला आणि त्याच्या प्रतिभेला आज ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ नमस्कार …
मेघांच्या गर्दीत हरवले मोरपीस देखणे.. आवेगात उसळले आणि हिरवाईत मिसळले मृगाचे हुंदडणे! रानप्राण खंतावले.. हुंकारले, आता, आषाढाच्या आशेवर जगणे!
आषाढ महिन्याची अशी ही ओढ, मन व्याकुळ करणारी. जीवाला कासावीस करणारी, तसे पाहिले तर वरुणराजाने पर्जन्यवृष्टी केल्यानंतर येणारा दुसरा महिना असतो आषाढ, पण ज्येष्ठ महिन्यापेक्षा लोकसाहित्याला आषाढाचेच भारी कौतुक. त्यामुळेच असेल कदाचित कविराज कालिदासाच्या कवितेत ‘आषाढस्य प्रथम दिवसे’च्या शब्दओळी कातर विरहलेणी खोदत जातात.
कवी कालिदासांच्या मनातील ही शब्दबद्ध असोशी, तृष्णा खरे तर माणसाच्या आरंभाच्या प्रवासापासून सोबत असलेली. निसर्गाच्या सहवासात जेव्हा माणूसही स्वत:ला निसर्गाचा एक घटक मानत होता, त्यावेळी त्याचे वागणे नैसर्गिक होते; परंतु आम्ही जस-जसे निसर्गापासून तुटत गेलो, तस-तसे आमचे जगणे-वागणे-बोलणे सारे काही, कृत्रिम बनले. या कृत्रिम जीवनाला ‘आषाढ ओढ’ असणार कशी? आषाढाच्या हिरव्या स्वप्नांची गोडी कळणार कशी?
आषाढ हा महिना मोठा विलक्षण, त्याचे नावच मुळी त्याच्या पुढे-मागे येणा-या ‘पूर्वा षाढा आणि उत्तर षाढा’ या दोन नक्षत्रांवरून पडलेले ज्येष्ठाच्या बरसातीने शांतावलेल्या धरतीला आषाढात खर्या अर्थाने हिरवा बहर येतो, म्हणून गोकुळातल्या सावळ्या श्रीकृष्णालाही आषाढ आवडतो. जगन्नाथ पुरीचा श्रीकृष्ण-बलराम- सुभद्रेचा रथोत्सव जसा याच महिन्यात तशीच ‘ग्यानबा-तुकाराम’च्या गजरात चालणारी पंढरीची वारीही आषाढातच निघते. कृष्णाचा पूर्वावतार भगवान विष्णूला चार महिन्याच्या विश्रांतीची सुरुवातही याच महिन्यातील ‘देवशयनी’ एकादशीला करावीशी वाटते.
असा हा आषाढ म्हणजे ख-या अर्थाने अष्टपैलू महिना, चिखळाळलेल्या शेतात आवेगाने उतरणा-या त्याच्या पाऊसधारांमध्ये प्राणशक्ती दडलेली असते. मातीच्या कुशीत दडलेल्या बियाण्यांना हिरवे बळ देऊन त्या वर आणतातच, पण या हिरव्या पात्यांना ‘सुफलतेचे’ वर दान करून आषाढ नामानिराळा राहतो.
आषाढातील पाऊस खरोखर नक्षत्रासारखाच देखणा- राजबिंडा- मन मोहवून घेणारा, मृगाच्या पाठीवरील नक्षी पाहून फक्त आमची
सीतामायच भुलली नव्हती, आजही गावा-गावातील आया-बाया आकाशापासून जमिनीपर्यंत, शेतातून ओहळापर्यंत चौखूर धावणार्या, खरे तर उधळणार्या मृगसरींवर भुलतात, भाळतात.. त्या मृगाच्या भरवशावर पेरतात जीवनदायी रत्नांचे दाणे.. आणि त्याच्या जोडीला असते जीवनगाणे.
आषाढ असा आमच्या अवघ्या जीवनाला व्यापून असतो. संसार तापाने पोळलेल्या वारक-यांची दिंडी जेव्हा पंढरपूरात पोहचते, तेव्हा कृष्ण मेघश्याम आषाढ दोन्ही कर कटेवर ठेवून वीटेवर उभा दिसतो. त्याचेच सावळे प्रतिबिंब प्रत्येक वारकर्यांच्या हृदयात उमटलेले. मग त्या हृदयांच्या असंख्य तारा झंकारतात आकाशात ‘जय जय विठोब्बा रखमाई’चा झणत्कांर होतो, वारकर्यांच्या मनातील सावळा मेघश्याम आषाढ घन बनून बरसू लागतो. झाडांच्या पानापानातून वाजू लागते टाळी आणि चंद्रभागेच्या पाण्यातून ऐकू येतात अभंग ओळी. ओल्या काळ्या मातीचा होतो अबीर बुक्का आणि मनामनात भरून राहतो आकाशाएवढा तुका…
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv