यामाहा मोटर्सने सणासुदीच्या काळात आपल्या वाहनांच्या किमती वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. दिवाळीपूर्वी यामाहाने R15 V4, MT15V2 आणि Aerox आदी लोकप्रिय मोटारसायकल्सच्या किमती वाढवल्या आहेत. किमती वाढवण्याच्या कारणांबाबत कंपनीकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर आता वाढलेल्या किमती तातडीनं लागूदेखील करण्यात येणार आहेत. सप्लाय चेनमधली समस्या आणि कच्च्या मालाच्या किमती पाहता कंपनीनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. वाढलेल्या किमतीचा परिणाम कंपनीच्या वाहनविक्रीवर होऊ शकतो, असं मानलं जात आहे; पण यामाहा बाइकला असलेली मागणी लक्षात घेता कंपनीला विक्रीच्या आकड्यांबाबत खात्री आहे. यामाहा कंपनीनं आपल्या कोणत्या बाइकच्या किमतीत वाढ केली आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. यामाहा एफझेडएस 25 : यामाहा कंपनीने आपल्या एफझेडएस 25 या लोकप्रिय मॉडेलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या बाइकच्या किमतीत एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता ही बाइक ग्राहकांना 1,52,400 रुपयांत उपलब्ध होईल. ही वाढ फक्त कॉपर आणि मॅट ब्लॅक कलरवर असेल. त्याचप्रमाणे कंपनीनं Fz25 आणि FZ-X या बाइक व्हॅरिएंटच्या किमतीदेखील वाढवल्या आहेत. एफझेड 25 च्या मेटॅलिक ब्लॅक आणि रेसिंग ब्लू कलरच्या बाइकची किंमत आता 1,47,900 रुपये असेल, तर एफझेडएक्सची किंमत 1,33,900 रुपये असेल. यामाहा एमटी-15 व्हर्जन 2.0 : यामाहा एमटी -15 व्हर्जन 2.0 या बाइकच्या किमतीत किरकोळ वाढ करण्यात आली आहे. कंपनीने या बाइकची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. या बाइकच्या बेस मॉडेलची किंमत आता 1,63,900 रुपये, तर टॉप मॉडेलची किंमत 1,64,900 रुपये असेल. या बाइकमध्ये दमदार 155cc इंजिन आहे. हे इंजिन 18.4bhp पॉवर जनरेट करतं. मॉन्स्टर एनर्जी मोटो जीपी एडिशन या या बाइकच्या दुसऱ्या व्हॅरिएंटसाठी ग्राहकांना 500 रुपये जास्त मोजावे लागतील. Yamaha R15M WGP 60th Edition : यामाहाची R15 ही सर्वाधिक लोकप्रिय बाइक आहे. या बाइकची किंमत कंपनीनं एक हजार रुपयांनी वाढवली आहे. या बाइकची किंमत आता 1,91,300 रुपये असेल. या बाइकमध्ये 155 cc चं इंजिन असून, त्यातून 18.4 PS पॉवर आणि 14.2Nm टॉर्क जनरेट होते. या बाइकमध्ये ड्युएल चॅनेल एबीएस, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डब्लूजीपी लोगो, गोल्डन व्हील्स, प्रीमियम गोल्ड ट्युनिंग फोर्क्स, अॅडव्हान्स्ड फुली डिजिटल एलसीडी मीटर कन्सोल, असिस्ट आणि स्लीपर क्लच, व्हेरिएबल व्हॉल्व्ह अॅक्च्युएशन, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, क्विक शिफ्टर, अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स आदींसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.