अल्पवयीन मुलाकडून वाहन चालवताना अपघात झाला तर गाडीच्या मालकाला तुरुंगवासही घडू शकतो.
मुंबई, 12 नोव्हेंबर : रोड सेफ्टी अर्थात रस्ता सुरक्षा हा मुद्दा नेहमीच चर्चेचा मुख्य विषय राहिला आहे. जगभरात रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण वाढत आहे. भारतातही दर वर्षी सुमारे दीड लाख व्यक्ती रस्ते अपघातात मरण पावतात. आपल्या देशातल्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 33 टक्के नागरिकांकडे टू व्हीलर्स आहेत. कामावर जाण्यासाठी, शाळा-कॉलेजला जाण्यासाठी किंवा फेरफटका मारण्यासाठी या टू व्हीलर्सचा वापर केला जातो. अनेकदा आपल्याला अचानक गरज पडल्यास आपण आपल्या मित्राची किंवा ओळखीच्या व्यक्तीची गाडी वापरतो. याउलट, आपला मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीदेखील त्यांना गरज पडल्यास आपली गाडी वापरतात. एकमेकांना मदत करण्याच्या हेतूनेच आपण गाड्यांची देवाण-घेवाण करत असतो; मात्र असं करताना वाहतूक कायद्यांकडे दुर्लक्ष केलं जात नाहीये ना, याची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा ही बाब वाहनाची मागणी करणारी आणि आपलं वाहन समोरच्याला देणारी व्यक्ती अशा दोघांसाठीही घातक ठरू शकते. वाहतुक नियमांनुसार, तुमच्या नावावर नोंदणीकृत असलेलं एखादं वाहन तुमच्या किंवा कोणत्याही अल्पवयीन मुलाला चालवण्यासाठी दिलं आणि असं करताना तुम्ही पकडले गेलात, तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. अल्पवयीन मुलाकडून वाहन चालवताना अपघात झाला तर गाडीच्या मालकाला तुरुंगवासही घडू शकतो. (Top CNG Cars: तगड्या फीचर्सनी युक्त आहेत देशातील ‘या’ टॉप 5 सीएनजी कार; वाचा किंमत) 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नका 16 वर्षांखालच्या मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, असा नियम आहे. तुमचं स्वत:चं मूल असेल तरीही अशी चूक करू नका. कारण, कायदे तयार करताना नातेसंबंधांचा नाही, तर वयाचा निकष विचारात घेतला जातो. म्हणून अल्पवयीन मुलांच्या हातात गाडी देऊ नका. 25 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो भारतातल्या कोणत्याही परिवहन कार्यालयाने वयाच्या 18व्या वर्षापर्यंत कोणालाही वाहन चालविण्याचा परवाना देऊ नये असा कायदा आहे. अल्पवयीन मुलानं वाहन चालवताना अपघात झाल्यानंतर वाहन चालविणाऱ्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा कायदा आहे. तसंच अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकालाही दंड ठोठावला जातो. हा दंड 25 हजार रुपयांपर्यंत असू शकतो. संबंधित विभागाने (वाहतूक विभाग किंवा वाहतूक पोलीस) पाठवलेल्या चलनाची दंडाची रक्कम 15 दिवसांच्या आत जमा करणंदेखील बंधनकारक असतं. नियमांनुसार, दोषी चालक 15 दिवसांच्या आत दंडाची रक्कम जमा करू शकला नाही, तर त्या रकमेत आणखी वाढ होऊ शकते. वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर असेल तिलाच शिक्षा आणि दंडाच्या कारवाईला सामोरं जावं लागेल. कधी-कधी अशी प्रकरणं न्यायालयात जातात, तेव्हा निष्काळजी वाहनधारकाला न्यायालय जे काही सांगेल, ते मान्य करावंच लागतं. नॉन-गिअरची वाहनं 16 ते 18 वयोगटातली अल्पवयीन मुलं गिअर नसलेली वाहनं चालवू शकतात. याबाबत दिल्ली वाहतूक पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले एसीपी हनुमान सिंह यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “देशातले वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. त्यांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली तर देशातले 27 ते 30 टक्के रस्ते अपघात कमी होऊ शकतात; मात्र सध्या परिस्थिती एकदम उलट आहे. आपल्या मुलांच्या प्रेमात आंधळे झालेले पालक त्यांना लवकरात लवकर गाडी शिकवण्याचा प्रयत्न करतात. हाच प्रकार कधीकधी पालक आणि मुलांसाठी समस्या ठरू शकतो. एकदा अद्दल घडली की मग शहाणपण येतं.” (‘या’ 5 कारवर भारतीय फिदा, खरेदी करण्यासाठी लागतायेत रांगा) सेवानिवृत्त एसीपी हनुमान सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांना कायद्यांची माहिती नाही आणि त्यांना वाहतूक कायदे जाणून घेण्यात रसही नाही. अनेकांची फक्त हीच इच्छा असते, की त्यांच्या मुलानं वाहन चालवायला शिकावं, जेणेकरून पालकांची जबाबदारी कमी होईल; पण अनेकदा यामुळे अपघातही होतात. अल्पवयीन मूल किंवा कोणताही वाहनचालक आपल्या नावे नोंदणीकृत नसलेलं वाहन चालवताना आढळला तर पोलीस ते वाहन जप्त करू शकतात. त्यानंतर कोर्टातच याबाबत निर्णय घेतला जातो, जेणेकरून ज्याच्या नावे वाहनाची नोंद आहे, त्याला अद्दल घडेल.