नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : कारमधला सर्वांत दुर्लक्षित केला जाणारा भाग म्हणजे टायर; पण टायर हा असा भाग आहे, जो कारची लाइफलाइन म्हणून काम करतो. कारण यावरच संपूर्ण गाडी अवलंबून असते. म्हणूनच टायर्सची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. टायरमधल्या किरकोळ दोषाकडेही दुर्लक्ष केल्याने मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे टायर्सची वेळोवेळी काळजी घेणं, त्यांकडे लक्ष देणं, त्यांच्याशी संबंधित सर्व्हिसिंग वेळेवर करणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा जीर्ण झालेले टायर पाहूनही हे आणखी काही दिवस चालतील, असा विचार अनेक जण करतात; पण ते धोक्याचं आहे. मुळात काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही तुमच्या गाडीच्या टायरचं आयुष्य वाढवू शकता व सुरक्षित राहू शकता. थ्रेड्सची तपासणी : टायरमध्ये नेहमी 3 मिमी थ्रेड्स असणं आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर टायरमध्ये बनवलेल्या पट्ट्यांची खोली 3 मिमी असणं आवश्यक आहे. त्यामुळे गाडीची रस्त्यावरची ग्रिप कायम राहते. यापेक्षा कमी ग्रिप असल्यास टायर पंक्चर होण्याचा, फुटण्याचा किंवा घसरण्याचा धोका नेहमीच असतो. त्यामुळे 3 मिमीपेक्षा कमी ग्रिप असल्यास टायर तात्काळ बदला. टायरमधली हवा : कारच्या टायरमधल्या हवेचा दाब नेहमी योग्य असावा. उन्हाळ्यात टायरमधली हवा 32 पीएस आणि हिवाळ्यात 35 पीएस ठेवा. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने वाहनांच्या टायरमध्ये हवेचा दाब वाढतो. त्याच वेळी हिवाळ्यात हा दाब कमी राहतो. टायर्समध्ये योग्य दाबाने हवा असल्यास तुमच्या वाहनाचे टायर कमी घसरतील आणि पंक्चर होण्याचा धोका कमी होईल. अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग : कार व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग वेळोवेळी करा. तो कालावधी साधारणपणे दर 5 हजार किलोमीटर्सचा असावा. खराब रस्त्यांवर गाडी जास्त चालवत असाल तर 3 हजार किलोमीटरनंतर व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग करून घ्या. कारण खराब व्हील अलाइनमेंट किंवा बॅलन्सिंगमुळे टायर्स जास्त झिजतातच, शिवाय ते कमी-जास्त प्रमाणात झिजतात. त्यामुळे गाडीच्या कार्यक्षमतेत फरक पडण्याबरोबरच टायर्सचं आयुष्य कमी होतं. हेही वाचा - सिंगल चार्जमध्ये तब्बल 500 किमी धावेल OLAची पहिली Electric Car, पाहा पहिली झलक ट्यूब टाकू नका : अनेक वेळा टायर नवीन असूनही साइड कट किंवा थ्रेड कटसारख्या समस्यांमुळे पूर्णपणे खराब होतो. तेव्हा पंक्चर काढणाऱ्या व्यक्ती ट्यूबलेस टायरमध्ये ट्यूब टाकण्याचा सल्ला देतात; पण तसं अजिबात करू नका. कारण तसं केल्याने त्या एका टायरचं वजन वाढतं आणि वाहनाची अलाइनमेंट बिघडते. शिवाय बाकीच्या टायर्सची लवकर झीज होईल. त्यामुळे अशा स्थितीत फक्त खराब झालेला टायर बदलून टाका. टायरचं रोटेशन करणं फायद्याचं : टायरचं पुढे-मागे रोटेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण गाडीचे इंजिन पुढच्या बाजूला असल्यामुळे आणि बहुतेकशा गाड्यांचं फ्रंट व्हील ड्राइव्ह असल्यामुळे गाडीच्या पुढच्या टायर्सना सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे ते लवकर झिजतात; पण टायर्सचं रोटेशन केल्याने म्हणजेच काही कालावधीने पुढचे टायर्स मागे व मागचे टायर्स पुढे टाकल्याने ते एकसारख्या प्रमाणातच झिजतील. त्यामुळे त्यांचं आयुष्य वाढेल. यामुळे गाडीची अलाइनमेंटसुद्धा व्यवस्थित राहते.