नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी त्यांच्या दिलखुलास स्वभावासाठी आणि तशाच वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रतिक्रिया देताना गडकरी यांच्या याच स्वभावाची झलक पुन्हा एकदा दिसली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली एक घोषणा ऐकल्यावर त्यांना आपल्या कॉलेजच्या दिवसातली स्कूटर आठवली. ‘त्या वेळी जेमतेम 30-32 अॅव्हरेज देणारी स्कूटर आम्ही झोकात मिरवायचो आता 80 मायलेजच्या गाड्या आल्या आहेत’, असं गडकरी म्हणाल. जुन्या गाड्या बाद करायच्या धोरणाबद्दल ( Vehicle Scrapping Policy) ते बोलत होते. पुढच्या पाच वर्षांत भारत मॅन्युफॅक्चरिंग हब होईल. छोट्या आणि मध्यम उद्योगांबरोबर वाहन उद्योग मोठा होत आहे. हा उद्योग 6 लाख कोटींच्या उलाढालीचा होईल. त्यामुळे जुन्या वाहनांची विल्हेवाट आवश्यकच आहे, असं गडकरी म्हणाले. जुनी वाहनं प्रदूषण खूप करतात. त्यामुळे ती पर्यावरणाला हानीकारक आहेत. ती रस्त्यावर धावणं बंद करणं हिताचं आहे. म्हणूनच vehicle scrapping policy आणण्यात येणार आहे.
काय आहे स्क्रॅपिंग पॉलिसी? जुन्या वाहनांची विल्हेवाट लावायची जबाबदारी वाहन मालकांची आहे. 20 वर्षांपूर्वीच्या गाड्या यापुढे वापरता येणार नाहीत. सविस्तर धोरणाची घोषणा पंधरा दिवसात करू, असं गडकरी यांनी सांगितलं आहे. या धोरणानुसार 51 लाख छोटी वाहनं स्क्रॅप होतील. 17 लाख मध्यम वाहनांचंही रिसायकलिंग होईल. यामुळे 23 ते 25 टक्के प्रदूषण कमी होईल. नवी वाहनं रस्त्यावर येतील. जुन्या वाहनांचं स्टील, इतर धारू, रबर याचा पुनर्वापर करण्यावर भर आहे. या धोरणामुळे ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये भारताचा क्रमांक जगात उंचावेल, असं हे धोरण सांगतं. पुढच्या 15 दिवसात वाहनांच्या विल्हेवाटीसंदर्भातले नियम जारी केले जातील, असं गडकरी यांनी स्पष्ट केलं.