या इलेक्ट्रिक कारचा खर्च बाईकच्या तुलनेत काहीच नाही
मुंबई, 19 ऑक्टोबर : नोकरी सरकारी असो की खासगी, कारने ऑफिसला जाण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीच्या जमान्यात आता कमी पगार असलेल्या लोकांना हे अवघड झाले आहे. कार घेण्यासाठी आधी खूप पैसा खर्च करावा लागतो. त्यानंतरही कोणी लोनवर खरेदी केलीच तर पेट्रोल आणि डिझेलवर गाडी चालवणे खूप महाग होत आहे. मात्र, आता भारतीय बाजारपेठेत एक अशी कार लाँच झाली आहे, जी कारने प्रवास करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते. येथे आम्ही टाटाच्या नुकत्याच लाँच झालेल्या Tiago EV बद्दल बोलत आहोत. भारतीय बाजारात उपलब्ध असलेली ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. तिची किंमत 8.85 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप व्हेरिएंटसाठी 12.38 लाख रुपयांपर्यंत जाते. तिची खास गोष्ट म्हणजे एका चार्जवर 315 किमीपर्यंतची रेंज देते. वाचा - आता चालता चालता चार्ज होईल इलेक्ट्रिक कार, जगातील पहिली सोलर EV लाँच महिनाभरात फक्त 2,100 रुपये खर्च होतील Tata Tiago EV ची रेंज त्याच्या बेस मॉडेलबद्दल सांगायचे तर ते एका चार्जवर 250 किमीपर्यंत धावू शकते. या इलेक्ट्रिक कारमध्ये 19.2kWh क्षमतेची बॅटरी आहे. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ते एका किलोवॅटमध्ये सुमारे 13 किमी धावू शकते. व्यावसायिक इलेक्ट्रिक चार्जरवर 18 रुपये प्रति युनिट दराने चार्ज केल्यास एकूण 350 रुपये लागतील. त्याच्या प्रति किलोमीटर धावण्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, ते सुमारे 1.4 रुपये प्रति किलोमीटर इतके येते. जर तुम्ही रोज 50 किमी जात असाल तर महिनाभरात तुमचा खर्च 2,100 रुपये होईल.
वेगवान कार Tiago EV 5.7 सेकंदात 0 ते 60 kmph चा वेग प्राप्त करू शकते. Tiago EV ला पॉवर डिलिव्हरीत मदत करण्यासाठी स्पोर्ट मोड देखील देण्यात आला आहे, असा दावा टाटा कंपनीकडून करण्यात आला आहे. बॅटरी पॅक डीसी फास्ट चार्जरने चार्ज केला जाऊ शकतो, ज्याची बॅटरी 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 57 मिनिटे लागतात, तर 7.2 किलोवॅट होम चार्जर 3 तास 36 मिनिटांत कार पूर्णपणे चार्ज करू शकते.